म्हापसा : वास्को येथील ‘संडे मार्केट’मध्ये (Vasco Sunday Market Fire incident) घडलेल्या भीषण आग दुर्घटनेनंतर राज्यातील बाजारपेठांच्या अग्नी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर अग्निशामक दलाने म्हापसा बाजारपेठेची (Mapusa Market) पाहणी केली. परंतु या मार्केटमधील पाचही ‘फायर हायड्रन्ट हे नादुरूस्त अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाल्याने अग्नीशामक दल तसेच प्रशासकीय यंत्रणांच्या कार्यपध्दतीचे वाभाडे निघाले आहेत.
मंगळवारी सकाळी अग्निशामक दल आणि म्हापसा नगरपालिका अधिकार्यांनी बाजारपेठेतील ‘फायर हायड्रन्ट’ची संयुक्त पाहणी केली. यावेळी अग्निशामक दलाचे संचालक नितीन रायकर, अधिकारी बॉस्को फेर्रांव, म्हापसा स्टेशन अधिकारी गणेश गोवेकर व इतर अधिकारी तसेच म्हापसा पालिकेचे कनिष्ठ अभियंता सुभा आमोणकर व इतर अधिकारी उपस्थित होते.
पूर्वी ही पाहणी तसेच ‘फायर हायड्रन्ट’ची चाचणी ही उपजिल्हाधिकारी व पेयजल पुरवठा अधिकार्यांना विश्वासात घेऊन केली जायची. मात्र यावेळी या यंत्रणांना बगल देण्यात आल्याने व्यापारी वर्गामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. या संयुक्त पाहणी वेळी पाचपैकी एकही ‘हायड्रन्ट’ हा चालत नसल्याचे दिसून आले.
या पाहणीविषयी अग्निशामक दलाचे संचालक नितीन रायकर यांनी सांगितले की, वास्को दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व बाजारपेठांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही पाहणी करण्यास सुरू केली आहे. बाजारपेठांच्या सुरक्षेतील कमतरता आम्ही पाहणार आहोत. त्यानुसार संबंधित नगरपालिकांना आवश्यक सूचना केल्या जातील. अग्नीशामक दलाकडे मुबलक साधनसुविधा आहेत.
परंतु आपत्कालीन परिस्थिती वेळी वेळ वाया जाऊ नये यासाठी मार्केटमधील सुरक्षा यंत्रणा कार्यरत असणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. म्हापसा मार्केटमध्ये पाच ‘फायर हायड्रन्ट’ असून त्यातील एकही चालत नाही. हे हायड्रन्ट तातडीने कार्यान्वयीत करावेत; अशी सूचना नगरपालिका अधिकार्यांना केली असल्याचे रायकर यांनी सांगितले.
म्हापसा येथे यापूर्वी संचालकांनी सेवा बजावली तरी..
अग्निशामक दलाचे संचालक नितीन रायकर, सहाय्यक विभागीय अधिकारी बॉस्को फेर्रांव यांनी म्हापसा येथे ‘फायर स्टेशन’ अधिकारी म्हणून सेवा बजावलेली आहे. या अधिकार्यांच्या कार्यकाळा पूर्वीपासून बाजारपेठेत ‘फायर हायड्रन्ट’ची व्यवस्था आहे.
तरीही गेली अनेक वर्षे हे ‘फायर हायड्रन्ट’ सुरळीत करण्याच्यादृष्टीने अग्नीशामक दलाला प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करणे शक्य झालेले नाही. शोभेची वस्तू ठरलेले हे ‘हायड्रन्ट’ एखादी दुर्घटना किवा सणासुदीवेळी तपासण्यापलीकडे कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत.


