फटाके विक्रेत्यांसाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे जारी

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांची विक्री, हाताळणी आणि साठवणूक करताना आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने विक्रेते व दुकानदारांसाठी विशेष सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
38 mins ago
फटाके विक्रेत्यांसाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे जारी

मडगाव : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांची विक्री, हाताळणी आणि साठवणूक करताना आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने विक्रेते व दुकानदारांसाठी विशेष सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. फटाक्यांची साठवणूक आणि विक्री करताना सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी (Collector & District Magistrate South Goa) एग्ना क्लीटस (आयएएस) यांनी दिले आहेत.

जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या सूचनेनुसार, फटाक्यांचा साठा थेट सूर्यप्रकाश, उष्णता आणि आगीच्या स्रोतांपासून दूर, थंड, कोरड्या व हवेशीर जागेत करावा. स्वयंपाकघर, गॅस सिलिंडर, ज्वलनशील पदार्थ किंवा खुल्या आगीच्या जवळ फटाके ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच दुकानांमध्ये कार्यरत अग्निशामक उपकरणे उपलब्ध ठेवणे बंधनकारक आहे.

फटाक्यांची विक्री व साठवणूक असलेल्या परिसरात धूम्रपान, आगपेटीचा वापर किंवा आगीची ज्योत नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. एकाच ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक फटाक्यांचा साठा करू नये. शॉर्टसर्किट किंवा ठिणग्यांमुळे आग लागण्याचा धोका टाळण्यासाठी विद्युत जोडण्या व उपकरणांची योग्य देखभाल करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

मुलांना फटाके हाताळण्यास देऊ नये

 फटाक्यांचे स्टॉल अशा प्रकारे उभारावेत की नागरिकांच्या ये-जा करण्यास तसेच आपत्कालीन बाहेर पडण्याच्या मार्गांना अडथळा निर्माण होणार नाही. अग्निशमन दलाच्या वाहनांनाही सहज प्रवेश मिळेल, याची खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. लहान मुलांना फटाके हाताळण्याची किंवा त्यांचा साठा करण्याची परवानगी देऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

नियमांचे पालन करण्याचे आवाहन

आगीची दुर्घटना घडल्यास तातडीने उपाययोजना करता याव्यात, यासाठी विक्रेते व दुकानदारांना अग्निसुरक्षेच्या प्राथमिक उपायांची माहिती असणे आवश्यक आहे. फटाक्यांची निष्काळजीपणे हाताळणी किंवा अयोग्य साठवणूक यामुळे मोठी जीवित व वित्तहानी होऊ शकते. त्यामुळे सर्व विक्रेत्यांनी नियमांचे पालन करून नागरिकांना सुरक्षित आणि अपघातमुक्त दिवाळी साजरी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा
सर्व पहा