मडगाव : बाणावली (Benaulim) येथे चार वर्षांच्या बालिकेला मेणबत्तीने चटके देऊन तिचा अमानुष छळ केल्याप्रकरणी कोलवा पोलिसांनी (Colva Police) संशयित हजरत अली मेहबूबसाब कलकेरी (२७, मूळ कारवार-कर्नाटक, सध्या बाणावली) याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित बालिकेची आई रेश्मा कडपी ही नोकरीनिमित्त कुवेतला गेल्याने तिने आपल्या चार आणि आठ वर्षांच्या दोन मुलींना दवर्ली येथील नातेवाईकांच्या देखरेखीखाली ठेवले होते. १० ऑक्टोबर रोजी संशयिताच्या सांगण्यावरून दोन्ही मुलींना बाणावली येथील त्याच्या घरी नेण्यात आले होते.
१ नोव्हेंबर रोजी दोन्ही मुलींना परत आणल्यानंतर चार वर्षांच्या बालिकेच्या शरीरावर गंभीर भाजल्याच्या जखमा आढळून आल्या. याबाबत आठ वर्षांच्या मोठ्या बहिणीकडे चौकशी केली असता, धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जेवताना लहान बहिणीकडून शौच झाल्याने घर अस्वच्छ झाल्याच्या रागातून संशयिताने दोन्ही मुलींना मारहाण केली. तसेच चार वर्षांच्या बालिकेच्या गुप्तांगासह शरीराच्या अन्य भागांवर पेटत्या मेणबत्तीने चटके दिल्याचा आरोप आहे.
या घटनेची माहिती मिळताच वास्को येथील 'सवेरा ट्रस्ट'च्या अध्यक्षा तारा केरकर यांनी पुढाकार घेत कोलवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह पॉक्सो कायद्याच्या कलम ८ आणि गोवा बाल कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला.
कोलवा पोलिसांनी संशयिताला अटक करून न्यायालयात हजर केले असता, पुढील तपासासाठी न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षदा नाईक देसाई या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


