आयर्नमॅन ७०.३ गोव्याच्या सहाव्या आवृत्तीत २,००० हून अधिक खेळाडूंचा सहभाग

१५० गोमंतकीय धावणार : रविवारी पणजी येथे आयोजन

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
29th October, 11:09 pm
आयर्नमॅन ७०.३ गोव्याच्या सहाव्या आवृत्तीत २,००० हून अधिक खेळाडूंचा सहभाग

पणजी : आयर्नमॅन ७०.३ गोवा स्पर्धेच्या सहाव्या आवृत्तीमध्ये ३० देशांतील दोन हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. रविवारी होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यंदा १५० गोमंतकीय खेळाडूही शर्यतीत धावणार असून, राज्यामध्ये या खेळांविषयी वाढत चाललेली आवड या वाढत्या सहभागातून स्पष्ट होत असल्याचे आयर्नमॅन गोवाचे संचालक दीपक राज यांनी सांगितले.
मिरामार येथील पत्रकार परिषदेत बोलताना राज यांनी माहिती दिली की, २० ऑक्टोबर २०१९ रोजी झालेल्या पहिल्या आवृत्तीपासून या स्पर्धेचा सातत्याने विस्तार झाला आहे. पहिल्या वर्षी सुमारे १,००० खेळाडूंनी सहभाग घेतलेला, तर आतापर्यंतच्या सर्व आवृत्तींमध्ये मिळून सुमारे ६५ ते ७० देशांच्या खेळाडूंनी गोव्यातील या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.
गोवा पर्यटन खात्याच्या सहकार्याने आयोजकांनी स्थानिक खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विशेष प्रोत्साहन दिले आहे. ‘वंदे मातरम’ गीताच्या १५० व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून यंदा १५० गोमंतकीय खेळाडू शर्यतीच्या सुरुवातीच्या रेषेवर उभे राहणार आहेत. उल्लेखनीय म्हणजे, पहिल्या आवृत्तीत केवळ २५ ते ३० गोमंतकीय खेळाडू सहभागी झाले होते, ती संख्या आता १५० पर्यंत पोहोचली आहे.
तसेच शनिवारी आयोजित ‘आयर्नकिड्स’ शर्यतीत १,००० हून अधिक मुले सहभाग घेतील अशी अपेक्षा आहे. बालपणापासूनच मुलांमध्ये शारीरिक हालचालींची आवड निर्माण करून त्यांना तंदुरुस्त राहण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे राज यांनी स्पष्ट केले.
यावेळी राज यांनी गोवा पर्यटन खाते, पोलीस दल तसेच विविध सरकारी खात्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे या शर्यतीला झेंडा दाखवण्याची आहे. राज्य सरकार आणि विविध शासकीय यंत्रणांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याशिवाय ही स्पर्धा आयोजित करणे शक्य झाले नसते, असेही त्यांनी नमूद केले.
आयर्नमॅन आशिया-पॅसिफिकचे जागतिक भागीदारी उपाध्यक्ष जेरेमी कॅन यांनी सांगितले की, गोव्यामध्ये दोन हजारांहून अधिक खेळाडूंना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी आयोजक आणि त्यांच्या पथकाने मोठी मेहनत घेतली आहे. शर्यतीदरम्यान काही मार्ग बंद ठेवावे लागतात आणि वाहतुकीवर निर्बंद घालावे लागतात, ज्यामुळे स्थानिकांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागतो, याची त्यांना जाणीव आहे. परंतु, अशा स्पर्धांमुळे राज्याला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा मिळण्यासोबतच स्थानिक आर्थिक व्यवहारांना मोठी चालना मिळते आणि नागरिकांना निरोगी जीवनशैली अपनावण्यास प्रोत्साहन मिळते, असे त्यांनी सांगितले.
जर्सी, पदकांचे अनावरण
आयर्नकिड्स उपक्रमाचे महत्त्व सांगताना कॅन यांनी नमूद केले की, मुलांमध्ये लहानपणापासूनच शारीरिक सुदृढतेची आवड निर्माण करणे हा यामागील हेतू आहे. गोव्यातील आयर्नकिड्समध्ये सहभागी झालेल्या एका खेळाडूने पुढे जाऊन आयर्नमॅन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग घेतला, ही अत्यंत समाधानाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत 'आयर्नमॅन ७०.३ गोवा' स्पर्धेच्या नवीन जर्सी आणि पदकांचे आकर्षक अनावरण करण्यात आले.

स्पर्धेसाठी वाहतुकीत बदल
आयर्नमॅन ७०.३ स्पर्धेनिमित्त १ नोव्हेंबर रोजी दिवजा सर्कल ते कदंब बस स्थानक सर्कल पणजी ते नव्या झुवारी पुलापर्यंत (आगशी बाजूने) वाहतुकीत बदल केलेला असेल. १ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ ते दुपारी ३ वा. पर्यंत कदंब बस स्थानक सर्कल पणजी ते नवीन जुवारी पुलापर्यंत (आगशी बाजूने) राष्ट्रीय महामार्ग-६६ च्या उजव्या बाजूच्या लेनमधून दोन्ही बाजूची वाहतूक चालू राहील. अॅथलेटिक खेळाडूंच्या सुरक्षेसाठी मेरशी जंक्शन आणि इतर आवश्यक जागांवर बॅरिकेड्स लावण्यात येईल आणि वाहतूक सूचना फलक लावण्यात येईल.