पणजी : बुधवारी रात्री उशिरा मुरगाव परिसरात एकापाठोपाठ एक अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण आगीच्या घटना घडल्या. या एकापाठोपाठ घडलेल्या आगीच्या घटनांनी वास्को शहरात काही काळ भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास टिळक मैदानाजवळ असलेल्या कार अॅक्ससरीज आणि वाहनांच्या सुट्या भागांच्या दुकानाला अचानक आग लागली. या दुकानातील आगीत दुकान पूर्णपणे जळून खाक झाले असून, त्याच्या बाजूला उभी असलेली वाहने देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आणि त्यांचे मोठे नुकसान झाले. अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु ती विझवून कर्मचारी परतत असतानाच, रात्री ११ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास वास्कोमधील संडे मार्केट भीषण आग लागल्याची माहिती त्यांना मिळाली.
माहितीनुसार संडे मार्केटमधील १५० हून अधिक दुकाने व स्टॉल भस्मसात झाले. कपडे, पादत्राणे, भांडी आणि विविध वस्तू विकणाऱ्या लहान व्यावसायिकांचे यामुळे अतोनात नुकसान झाले. ऐन दिवाळीच्या सणाच्या तोंडावर ग्राहकांसाठी भरून ठेवलेला माल जळून खाक झाल्यामुळे व्यापाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुकानांतील जळालेला माल म्हणजे केवळ आर्थिक नुकसान नव्हते, तर तो व्यापाऱ्यांच्या वर्षांनुवर्षांच्या कष्टांचा ठेवा होता. मुलांचे शिक्षण, घरप्रपंच आणि कुटुंबाचे भविष्य ज्या दुकानांवर अवलंबून होती, तीच दुकाने क्षणात खाक झाल्याने व्यावसायिक पुरते खचून गेले.
डोळ्यांदेखत संपूर्ण संसार राखेच्या ढिगाऱ्यात गेलेला पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले; त्यांच्या या आक्रोशाने घटनास्थळावरील उपस्थितांचेही काळीज हेलावले. आगीच्या रौद्ररुपाने अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण मार्केटला आपल्या विळख्यात घेतले होते. आगीचे नेमके मूळ कारण, नुकसानीचा नेमका आकडा आणि प्रशासनाकडून पुढे काय पावले उचलली जातात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे वास्कोतील व्यापारी आस्थापनांमधील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या आपत्कालीन परिस्थितीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, स्थानिक आमदार कृष्णा ऊर्फ दाजी साळकर, आमदार संकल्प आमोणकर, तालुक्याचे पालक मंत्री मॉवीन गुदिन्हो, दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी एग्ना क्लीटस, मामलेदार तसेच इतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या दुर्घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, हे मोठे सुदैव असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी यावर प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, "या दुर्घटनेत झालेल्या नुकसानीची शासन पातळीवर सखोल पाहणी केली जाईल आणि प्रभावित सर्व दुकानदारांना सरकारतर्फे सर्वतोपरी आर्थिक मदत केली जाईल. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, याबद्दल मी देवाचे आभार मानतो." तसेच, काही व्यापाऱ्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश वास्को पोलिसांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्याचे पालक मंत्री मॉवीन गुदिन्हो यांनीही घटनास्थळी भेट देऊन या आपत्कालीन प्रसंगी प्रशासकीय त्रुटींवर भाष्य केले आणि आपत्कालीन यंत्रणा अधिक बळकट करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले.
वास्कोतील अग्नितांडवानंतर गोवा अग्निशामक व आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. नितीन व्ही. रायकर यांनी या संपूर्ण घटनाक्रमावर आपली प्रतिक्रिया दिली. आग आटोक्यात आणण्यासाठी वास्को, मडगाव, पणजी, वेर्णा, फोंडा आणि जुने गोवा येथून अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने रवाना करण्यात आल्या. तसेच भारतीय नौदल, तटरक्षक दल, गोवा शिपयार्ड लिमिटेड आणि मुरगाव पोर्ट ऑथॉरिटी यांच्या अग्निशामक पथकांनीही संयुक्तरीत्या शर्थीचे प्रयत्न केले. अरुंद रस्ते तसेच गर्दीमुळे जवानांना घटनास्थळी पोहोचताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
अखेर अनेक तासांच्या अथक परिश्रमांनंतर पहाटेच्या सुमारास आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. दरम्यान, सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ नुसार बाधित बाजारपेठ परिसर आणि त्याच्या ५० मीटर परिसरामध्ये नागरिकांच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी घातली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले, तरी शॉर्ट सर्किट किंवा इतर कारणांची पोलीस आणि अग्निशामक दलातर्फे कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, वास्को पोलिसांनी एकंदरीत घटनेप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला असून घातपाताच्या संशयातून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.


