वास्कोतील भीषण आगीत अनेक व्यापाऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी!

‘संडे मार्केट’मधील आगीप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा; घातपाताच्या दिशेने तपास : दिवाळीचा सण तोंडावर आलेला असताना वास्को येथे दोन ठिकाणी लागलेल्या आगींनी व्यापाऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली आहे. आयुष्यभराची मेहनत आणि कष्टातून उभा केलेला व्यवसाय डोळ्यांदेखत जळून खाक झाल्याने अनेक व्यापाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
9 mins ago
वास्कोतील भीषण आगीत अनेक व्यापाऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी!

वास्को : दिवाळीचा सण तोंडावर आलेला असताना वास्को येथे दोन ठिकाणी लागलेल्या आगींनी व्यापाऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली आहे. आयुष्यभराची मेहनत आणि कष्टातून उभा केलेला व्यवसाय डोळ्यांदेखत जळून खाक झाल्याने अनेक व्यापाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. बुधवारी रात्री उशिरा लागलेल्या या आगींमुळे सणासुदीच्या काळात आनंदाचे क्षण अनुभवण्याऐवजी अनेकांच्या वाट्याला दुःख आणि चिंतेचे सावट आले आहे. ‘संडे मार्केट’मधील (Sunday Market Vasco) आगीप्रकरणी वास्को पोलिसांनी (Vasco Police) अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. आणि घातपाताच्या दिशेने तपास सुरू केला आहे.

रोजीरोटी कमावण्यासाठी, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी थाटलेली दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. काही क्षणांत होत्याचे नव्हते झाले. दिवाळीच्या निमित्ताने चांगली कमाई होईल, कुटुंबाच्या गरजा पूर्ण करता येतील आणि सुखी संसाराचे स्वप्न साकार होईल, अशी आशा बाळगणाऱ्या व्यापाऱ्यांना या आगीने मोठा धक्का दिला आहे. आगीमुळे झालेल्या नुकसानीने अनेकांसमोर आता उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहण्याची भीती आहे.

या घटनांमुळे वास्को परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः ‘संडे मार्केट’मध्ये लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या आगीमागे घातपाताची शक्यता आहे का, या दिशेनेही तपास सुरू करण्यात आला आहे.

दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या घटनांनी व्यापाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले असून, आगीचे नेमके कारण आणि त्यामागे कोणाचा हात आहे का, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.

सरकार फटका बसलेल्या व्यापाऱ्यांबरोबर : मुख्यमंत्री

आगीची माहिती मिळताच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant), वास्कोचे आमदार दाजी (कृष्णा) साळकर यांनी रात्री उशीराच घटनास्थळी जाऊन पाहणी केली. व्यापाऱ्यांना दिलासा देतानाच या कठीण परिस्थितीत सरकारचा पूर्ण पाठिंबा जाहीर केला. अग्न‌ितांडवाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले. आग आटोक्यात आणल्यानंतर प्रशासनाने पुढील कारवाई सुरू केली आहे. 

सखाेल चौकशी करावी : गिरीश चोडणकर

वास्को मार्केटला लागलेल्या आगीची सखोल चौकशी करून लवकरात लवकर नुकसानग्रस्तांना  मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी केेली आहे. आगीची घटना दुःखद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा
सर्व पहा