केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ

पगारात होणार वाढ; नवा डिए ६३ टक्क्यांवर : केंद्र सरकारकडून १०,०१६ कोटी मंजूर; दिवाळीच्या तोंडावर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यात (DA) ३ टक्क्यांनी वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
51 mins ago
केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड;  महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली : दिवाळीच्या तोंडावर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)  यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यात (DA) ३ टक्क्यांनी वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. या वाढीसाठी केंद्र सरकारकडून १०,०१६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ६० टक्क्यांवरून ६३ टक्क्यांवर पोहोचणार आहे. सणासुदीच्या काळात त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.

मूळ वेतनानुसार किती वाढणार पगार?

२८ ऑक्टोबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वरील प्रस्ताव मंजूर करण्यात आला.  महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या आधारे मोजला जातो. महागाईचा वाढता भार कमी करण्यासाठी सरकारकडून या भत्त्यात वेळोवेळी सुधारणा केली जाते. नव्या दरानुसार, ज्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन २५ हजार रुपये आहे, त्याला यापूर्वी ६० टक्के दराने १५ हजार रुपये महागाई भत्ता मिळत होता. ६३ टक्के दर लागू झाल्यानंतर हा भत्ता १५,७५० रुपये होईल. म्हणजेच संबंधित कर्मचाऱ्याच्या मासिक वेतनात ७५० रुपयांची वाढ होईल. ही गणना केवळ मूळ वेतन आणि महागाई भत्त्यापुरती असून, इतर भत्ते व कपातींचा यात समावेश नाही.

वर्षातून दोनदा होते भत्त्यात सुधारणा

केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात साधारणपणे वर्षातून दोनदा, जानेवारी आणि जुलैपासून लागू होईल अशा पद्धतीने सुधारणा केली जाते. जानेवारीतील वाढीची घोषणा सहसा मार्च-एप्रिलमध्ये, तर जुलैमधील वाढीची घोषणा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये केली जाते. महागाईच्या आकडेवारीनुसार भत्त्यातील वाढ निश्चित केली जाते.

लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा

महागाईमुळे वाढणारा घरखर्च, अन्नधान्याच्या किमती आणि दैनंदिन गरजांवरील खर्च लक्षात घेता, महागाई भत्त्यातील वाढ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची ठरते. विशेषतः दिवाळीच्या काळात अतिरिक्त उत्पन्नामुळे कुटुंबांच्या खर्चाचे नियोजन करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे या निर्णयाने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक सुखावले आहेत. 

हेही वाचा
सर्व पहा