कोलकाता : पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यात १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप असलेला २३ वर्षीय प्रल्हाद दास हा पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला. सोमवारी मध्यरात्री आणि मंगळवारी पहाटेच्या दरम्यान गायघाटा येथे ही घटना घडली. गुन्ह्याच्या घटनास्थळाची पाहणी सुरू असताना संशयिताने पोलिस कर्मचाऱ्याचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिसांवर गोळीबार केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेनंतर प्रल्हाद दास याला गुन्ह्याच्या घटनास्थळी नेण्यात आले होते. तेथे घटनेची पाहणी सुरू असताना त्याने बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्याचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिसकावले आणि पोलिसांवर गोळीबार केला. यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला.
यात दास गंभीर जखमी झाला. त्याला चांदपारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या गोळीबारात कोणताही पोलीस कर्मचारी जखमी झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, संशयिताने पोलिसांचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर कसे हिसकावले आणि त्यानंतर नेमक्या कोणत्या परिस्थितीत गोळीबार झाला, याची चौकशी होण्याची शक्यता आहे. संशयिताच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेत संताप व्यक्त केला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी रुग्णालय परिसरासह आसपासच्या भागात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
तीन महिन्यांतील दुसरी घटना
पश्चिम बंगालमध्ये गेल्या तीन महिन्यांत बलात्कार आणि हत्या प्रकरणातील संशयित पोलिसांच्या गोळीबारात ठार होण्याची ही दुसरी घटना आहे. जुलै महिन्यात दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथे ११ वर्षीय मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील प्रमुख संशयितांपैकी एक असलेला प्रबास मंडल हा अशाच प्रकारच्या चकमकीत ठार झाला होता. त्यानेही पळून जाण्याचा प्रयत्न करत पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार केल्याचा दावा त्यावेळी पोलिसांनी केला होता.
‘माझी मुलगी मला पुन्हा मिळणार आहे का?’
पीडित मुलीच्या आईने संशयिताच्या मृत्यूबाबत समाधान व्यक्त केले, तर वडिलांनी पोलिसांनी योग्य कारवाई केल्याचे म्हटले. मुलीच्या वडिलांनी भावनिक प्रतिक्रिया देताना, “माझी मुलगी मला पुन्हा मिळणार आहे का? कधीच नाही असे म्हणत दु:ख व्यक्त केले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयिताने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि गोळीबार केला, त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर दिले.


