ऑनलाइन गेमिंगच्या कर्जाला कंटाळून सातार्डा येथील मायलेकाची आत्महत्या

शोकाकूल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
6 mins ago
ऑनलाइन गेमिंगच्या कर्जाला कंटाळून सातार्डा येथील मायलेकाची आत्महत्या

सावंतवाडी : ऑनलाइन गेमिंगसाठी घेतलेल्या कर्जाचा वाढता बोजा आणि त्यातून निर्माण झालेल्या तीव्र मानसिक तणावातून सातार्डा-रायाचेपेड येथील मायलेकाने घरापासून अवघ्या तीनशे मीटर अंतरावर असलेल्या तेरेखोल नदीपात्रात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. एकमेकांच्या हातांना दोरीने बांधलेल्या अवस्थेत या दोघांचे मृतदेह रविवारी नदीपात्रातून आढळून आले होते.

श्रुतिका श्यामसुंदर आरोंदेकर (वय ६३) आणि तुकाराम ऊर्फ सुहास श्यामसुंदर आरोंदेकर (वय २७) अशी मायलेकांची नावे आहेत. आई आणि मुलगा दोघेच एकत्र राहत होते आणि त्यांच्या पश्चात जवळचे कोणीही नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. एकाच कुटुंबाचा अशा प्रकारे अंत झाल्याने परिसरातील नागरिक सुन्न झाले आहेत. सोमवारी शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले
शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेचा उलगडा रविवारी झाला. नदीपात्राच्या काठावर चप्पल आणि बॅटरी आढळून आल्याने ग्रामस्थांना संशय आला. त्यांनी तातडीने शोधाशोध सुरू करून पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि सातार्डा दूरक्षेत्राचे पोलीस नागनाथ टक्केकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
गोवा पोलीस आणि सावंतवाडी पोलिसांनी बोटीच्या साहाय्याने नदीपात्रात शोधमोहीम राबवली. मात्र, मृतदेह पाण्याच्या आत असल्यामुळे शोधकार्यात अडचणी निर्माण झाल्या. दुपारपर्यंत रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल न झाल्याने मृतदेह बाहेर काढण्यास विलंब झाला.
पोलीस व प्रशासकीय यंत्रणेचे प्रयत्न सुरू असतानाच, स्थानिक ग्रामस्थ राऊळ यांनी ज्या ठिकाणी मायलेकांनी नदीत उडी घेतल्याचा संशय होता, त्या ठिकाणी गळ टाकून शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि दोन्ही मृतदेह गळाला लागले. विशेष म्हणजे, एकमेकांचे हात दोरीने बांधलेल्या अवस्थेत असलेले हे मृतदेह रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले.
मृतक सुहास याने ऑनलाइन गेमिंगसाठी मोबाईलच्या माध्यमातून कर्ज घेतले होते. कर्जाची ही रक्कम सतत वाढत गेल्यामुळे तो तीव्र आर्थिक तणावाखाली होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. याच नैराश्येतून आणि तणावातून या मायलेकाने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, घटनेमागील नेमकी व सविस्तर कारणे पोलिसांच्या सखोल तपासातून समोर येणार आहेत.

आर्थिक विळख्याने हिरावले दोन जीव
आर्थिक अडचणींचा वाढता ताण, ऑनलाइन गेमिंगचे भीषण धोके आणि त्यातून निर्माण होणारी मानसिक घालमेल किती जीवघेणी ठरू शकते, याचे वास्तव या घटनेने पुन्हा एकदा समोर आणले आहे. कालपर्यंत आपल्या शेजारी वावरणारे मायलेक अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने सातार्डा-रायाचेपेड परिसरात दुःखाचे सावट पसरले आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या व्यक्तींना वेळीच आधार मिळण्याची आणि अशा मार्गांपासून दूर राहण्यासाठी जनजागृतीची किती गरज आहे, हाच गंभीर प्रश्न या घटनेने निर्माण केला आहे.

हेही वाचा
सर्व पहा