मध्य प्रदेशात नर्मदा नदीपात्रात आढळली शेकडाे मतदार ओळखपत्रे

उच्चस्तरीय चौकशी सुरू, काँग्रेस आक्रमक

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
20 mins ago
मध्य प्रदेशात नर्मदा नदीपात्रात आढळली शेकडाे मतदार ओळखपत्रे

भोपाळ : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील मंडलेश्वर येथे नर्मदा नदीच्या घाटावर ३०० हून अधिक मतदार ओळखपत्रे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबवत असताना एका सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांना ही ओळखपत्रे सापडली. ही बहुतांश मतदार ओळखपत्रे इंदूरमधील विविध विधानसभा क्षेत्रांतील असल्याचा दावा केला जात असून या प्रकरणी प्रशासनाने उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदूर येथील एका स्वयंसेवी संस्थेचे सदस्य मंडलेश्वर येथील नर्मदा घाटावर स्वच्छता मोहीम राबवत होते. त्यावेळी त्यांना पाण्यात व काठावर मोठ्या प्रमाणात मतदार ओळखपत्रे तरंगताना आणि साचलेली दिसली. त्यांनी तातडीने याची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली.
घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मंडलेश्वरच्या एसडीओपी श्वेता शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीपात्रातून ३४३ मतदार ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. महसूल विभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून रीतसर पंचनामा केला असून सर्व ओळखपत्रे ताब्यात घेतली आहेत. या ओळखपत्रांवर इंदूरमधील विविध भागांतील पत्ते नोंदवलेले आहेत.
काँग्रेस आक्रमक
या धक्कादायक प्रकारानंतर काँग्रेसने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसने आपल्या अधिकृत ‘एक्स’ (ट्विटर) हँडलवरून या घटनेचा व्हिडीओ पोस्ट करत निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्ला चढवला आहे. इंदूरमधील मतदारांची ओळखपत्रे महेश्वर (मंडलेश्वर) येथे कशी पोहोचली? ती तेथे कोणी आणि का फेकून दिली? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. काँग्रेसने या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तात्काळ एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.
निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
सध्या देशात निवडणूक आयोगाच्या कारभारावरून आणि मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच हा प्रकार समोर आल्याने प्रशासकीय वर्तुळात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. इंदूरमधील मतदारांची ओळखपत्रे शेकडो किलोमीटर दूर नर्मदा नदीच्या पात्रात कशी काय आढळली, याचा शोध आता मंडलेश्वर पोलीस आणि महसूल विभाग घेत आहे.

हेही वाचा
सर्व पहा