टायगर श्रॉफनंतर आता त्याची अभिनेत्री मैत्रीण रडारवर; घराबाहेर कडेकोट बंदोबस्त

अभिनेत्री दिशा पटानीच्या घराबाहेर यापूर्वीही गोळीबार; अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यावर मुंबईतील जुहू परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर अभिनेत्री दिशा पटानी हिच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील बरेली येथे असलेल्या दिशाच्या मूळ निवासस्थानाबाहेर सोमवारी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
टायगर श्रॉफनंतर आता त्याची अभिनेत्री मैत्रीण रडारवर; घराबाहेर कडेकोट बंदोबस्त

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांच्यावर मुंबईतील जुहू परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani)  हिच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील बरेली येथे असलेल्या दिशाच्या मूळ निवासस्थानाबाहेर सोमवारी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. दिशाचे कुटुंबीय याच ठिकाणी राहत असल्याने त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेतली जात आहे.

रविवारी संध्याकाळी जुहू परिसरात टायगर श्रॉफच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी पाच ते सहा गोळ्या झाडल्या होत्या.  या घटनेत टायगर थोडक्यात बचावला; मात्र त्याचा चालक आणि घटनास्थळी उपस्थित असलेले अन्य दोघे जखमी झाले. या प्रकरणी तीन संशयितांना राजस्थानमधील कोटा रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली आहे.

दिशाच्या घरावर यापूर्वीही गोळीबार

दिशा पटानीच्या बरेली येथील घराबाहेर यापूर्वीही गोळीबाराची घटना घडली होती. १२ सप्टेंबर २०२५ रोजी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी तिच्या घराबाहेर सुमारे १० गोळ्या झाडल्या होत्या. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी गाझियाबाद येथे झालेल्या चकमकीत या प्रकरणातील संशयित रवींद्र आणि अरुण यांचा मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलासह हरियाणा विशेष कृती दल आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली होती.

टायगर-दिशाची मैत्री चर्चेत

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्यातील जवळीक अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय आहे. दोघांनी जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केल्याचे सांगितले जाते. २०१६ मध्ये ‘बेफिक्रा’ या म्युझिक व्हिडिओमध्ये ते एकत्र दिसल्यानंतर त्यांच्या नात्याबाबत चर्चा सुरू झाली. त्यानंतर २०१८ मध्ये ‘बागी २’ या चित्रपटातही त्यांनी एकत्र काम केले.

२०२२ मध्ये दोघांचे प्रेमसंबंध संपुष्टात आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, त्यांच्यातील मैत्री कायम असल्याचे दोघांनी विविध प्रसंगी सांगितले आहे. टायगरवरील हल्ल्यानंतर दिशाच्या कुटुंबाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याने या प्रकरणाकडे आता अधिक लक्ष लागले आहे.

ते नेपाळला पळून जाण्याच्या होते तयारीत

टायगरवरील गोळीबाराच्या प्रकरणातील तीन संशयितांना मुंबई पोलिसांनी राजस्थान पोलिसांच्या मदतीने कोटा रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले. सोमवारी सकाळी पुणे-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या सामान्य डब्यातून त्यांना पकडण्यात आले. प्राथमिक चौकशीत हे संशयित गोळीबारानंतर रेल्वेने प्रवास करत नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये बिहारमधील बेगुसराय येथील रितिक ऊर्फ रोशन, हरियाणातील सोनीपत येथील रेहान आणि एका अल्पवयीन संशयिताचा समावेश आहे.

दरम्यान, या गुन्ह्यात वापरण्यात आल्याचा संशय असलेली पल्सर दुचाकी अंधेरी परिसरातून जप्त करण्यात आली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा
सर्व पहा