टपाल कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची वार्ता; केंद्र सरकारकडून ६० दिवसांच्या बोनसला मंजुरी

दिवाळीपूर्वी १४ हजारांचा बोनस!; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर टपाल विभागातील (Department of Posts of India) कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी पात्र टपाल कर्मचाऱ्यांना ६० दिवसांच्या वेतनाइतका उत्पादकता-आधारित बोनस (PLB) मंजूर केला आहे. या निर्णयामुळे पात्र नियमित कर्मचाऱ्यांना सुमारे १४ हजार रुपयांपर्यंत बोनस मिळू शकतो. ग्रामीण डाक सेवक आणि पात्र अस्थायी कर्मचाऱ्यांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
7 hours ago
टपाल कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची वार्ता; केंद्र सरकारकडून ६० दिवसांच्या बोनसला मंजुरी

मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर टपाल विभागातील (Department of Posts of India)  कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी पात्र टपाल कर्मचाऱ्यांना ६० दिवसांच्या वेतनाइतका उत्पादकता-आधारित बोनस (PLB) मंजूर केला आहे. या निर्णयामुळे पात्र नियमित कर्मचाऱ्यांना सुमारे १४ हजार रुपयांपर्यंत बोनस मिळू शकतो. ग्रामीण डाक सेवक आणि पात्र अस्थायी कर्मचाऱ्यांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

टपाल विभागाने यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केले असून, सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. या बोनस योजनेत मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS), ग्रुप ‘सी’मधील कर्मचारी आणि अराजपत्रित ग्रुप ‘बी’मधील पात्र कर्मचारी व अधिकारी यांचा समावेश आहे. याशिवाय ग्रामीण डाक सेवक (GDS), पूर्णवेळ नैमित्तिक कामगार आणि नियमानुसार पात्र ठरणाऱ्या अस्थायी कर्मचाऱ्यांनाही लाभ मिळणार आहे.

नियमित कर्मचाऱ्यांना उत्पादकता-आधारित बोनस दिला जाणार आहे. ग्रामीण डाक सेवकांना अनुग्रह अनुदान (एक्स-ग्रेशिया), तर पात्र अस्थायी कर्मचाऱ्यांना संबंधित नियमांनुसार बोनस दिला जाईल.

बोनसच्या गणनेसाठी मासिक वेतनाची कमाल मर्यादा ७,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. पूर्ण आर्थिक वर्ष सेवा केलेल्या पात्र कर्मचाऱ्याच्या बोनसचे गणित पुढीलप्रमाणे आहे.

मासिक वेतनाची कमाल मर्यादा : ७,००० रुपये

 वेतन : ७,००० ÷ ३० = २३३.३३ रुपये

६० दिवसांचा बोनस : २३३.३३ × ६० = १३,९९९.८० रुपये

अशा प्रकारे, पूर्ण वर्षभर सेवा केलेल्या पात्र कर्मचाऱ्याला गणनेनुसार सुमारे १४,००० रुपये बोनस मिळू शकतो. मात्र, प्रत्यक्ष रक्कम कर्मचाऱ्याची पात्रता आणि लागू नियमांवर अवलंबून असेल. ज्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण आर्थिक वर्ष सेवा केलेली नाही किंवा ज्यांच्या सेवा कालावधीत खंड पडला आहे, त्यांना प्रत्यक्ष काम केलेल्या दिवसांच्या प्रमाणात बोनस दिला जाईल.

ग्रामीण डाक सेवकांच्या बोनसची गणना त्यांच्या टाइम-रिलेटेड कंटिन्युइटी अलाउन्स (TRCA) आणि लागू महागाई भत्त्याच्या आधारे केली जाणार आहे. त्यांच्यासाठीही गणनेची कमाल मर्यादा ७,००० रुपये असेल. सेवा कालावधीनुसार त्यांना मिळणाऱ्या रकमेचे प्रमाण निश्चित केले जाईल.

दिवाळीपूर्वी बोनस मिळाल्याने टपाल विभागातील पात्र कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या खर्चासाठी आर्थिक मदत होणार आहे. नियमित कर्मचाऱ्यांसोबत ग्रामीण डाक सेवक आणि पात्र अस्थायी कामगारांनाही लाभ मिळणार असल्याने त्यांचीही दिवाळी गोड होणार आहे. 

हेही वाचा
सर्व पहा