सिंधुदुर्ग: कुडाळ तालुक्यातील कडावल ते वर्दे मार्गापासून अवघ्या ७० मीटर अंतरावर एका कॉलेज युवतीची अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना शनिवारी (दि. १७) सायंकाळी उघडकीस आली. दामिनी किरण पालव (वय २०, रा. वर्दे - खालची पालववाडी) असे मृत तरुणीचे नाव असून, ती हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होती. या भीषण हत्याकांडामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, संशयिताने गोव्याच्या दिशेने पलायन केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे. मृत दामिनी पालव ही हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होती. घटनेच्या दिवशी सायंकाळी ५.३० ते ६ वाजण्याच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे कडावल येथील बसस्टॉपवर उतरली. तिथून ती पायीच वर्दे येथील आपल्या घराच्या दिशेने निघाली होती. वाटेत निर्मनुष्य रस्त्याचा फायदा घेत अज्ञात हल्लेखोराने तिला अडवले आणि तिच्यावर धारदार शस्त्राने अचानक प्राणघातक वार केले. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी होऊन जागीच मृत पावली. हल्ल्यानंतर मृतदेह नदीत फेकल्याचा प्राथमिक अंदाज असून, तरुणीचा मृतदेह नदीकाठच्या परिसरात आढळला.
दरम्यान, याच दरम्यान त्याच रस्त्यावरून काळा शर्ट परिधान करून मोटारसायकलवरून एक अनोळखी संशयित तरुण गेल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू होती. संशयित आरोपी या हत्येनंतर गोव्याच्या दिशेने पळून गेल्याचा संशय असून, पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी केली आहे.
पोलीस यंत्रणा सतर्क, युद्धपातळीवर तपास सुरू
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना वर्दी दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सिंधुदुर्ग पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. हा हल्ला पूर्वद्वेषातून झाला की अन्य काही वैयक्तिक कारणातून, याचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे.
महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर शांत आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या कोकणात दिवसाढवळ्या किंवा संध्याकाळच्या सुमारास एका तरुणीवर अशा प्रकारे जीवघेणा हल्ला झाल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये आणि विद्यार्थी वर्गात प्रचंड दहशत निर्माण झाली असून, लवकरात लवकर नराधम हल्लेखोराला अटक करून त्याला कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी संतप्त मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


