दिवाळीच्या भेटवस्तूंच्या आशेने सोशल मिडियावर पत्ता शेअर करणे पडले इन्फ्लुएन्सरला महाग!

मदुराईतील एका इन्फ्लुएन्सरने आपल्या फॉलोवर्सकडून भेटवस्तू मिळतील या आशेत सोशल मीडियावर घरचा पत्ता शेअर केल्यानंतर अनेकांनी त्याच्या नावाने लाखो रुपयांच्या ऑर्डर्स पाठवून त्याचा प्रचंड छळ केल्याची घटना घडली आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
2 hours ago
दिवाळीच्या भेटवस्तूंच्या आशेने सोशल मिडियावर पत्ता शेअर करणे पडले इन्फ्लुएन्सरला महाग!

मदूराई : सोशल मीडियाचा अतिवापर आणि वैयक्तिक माहिती सार्वजनिक ठिकाणी जाहीर करणे कधीकधी किती धोक्याचे ठरू शकते, याचा एक अत्यंत धक्कादायक धडा तमिळनाडूतील मदुराई येथील एका इन्फ्लुएन्सरला मिळाला आहे. दिवाळीच्या सणानिमित्त आपल्या चाहत्यांकडून गोड भेटवस्तू मिळतील या भाबड्या आशेने व्हीरामाणी नावाच्या इन्फ्लुएन्सरने स्वतःच्या घरचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र, त्याची हीच चूक त्याच्यासाठी मोठा मनस्ताप आणि संकट ठरली आहे. काही खोडसाळ आणि विकृत प्रवृत्तीच्या लोकांनी या माहितीचा गैरवापर करत त्याच्या नावाने लाखो रुपयांच्या वस्तूंच्या 'कॅश ऑन डिलिव्हरी' ऑर्डर्स नोंदवून त्याचा छळ सुरू केला.



आपली माहिती सार्वजनिक केल्यानंतर अवघ्या काही तासांतच व्हीरामाणी याच्या घराबाहेर वेगवेगळ्या डिलिव्हरी बॉईजची लांबलचक रांग लागली. त्याने कधीही ऑर्डर न केलेले टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन आणि अत्यंत महागडे स्मार्टफोन्स त्याच्या पत्त्यावर येऊ लागले, ज्यामध्ये तब्बल १ लाख ६९ हजार रुपयांच्या टीव्हीचाही समावेश होता. या सर्व वस्तू 'कॅश ऑन डिलिव्हरी' पद्धतीवर असल्याने डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी केली. परंतु, आपण या वस्तू मागवल्याच नसून त्या खरेदी करण्याची आपली क्षमता नाही, असे स्पष्ट सांगत त्याने वस्तू स्वीकारण्यास नकार दिला. हा खोडसाळपणा केवळ घरगुती उपकरणांपर्यंतच मर्यादित राहिला नाही, तर त्याच्या नावाने फूड ऑर्डर्ससह अगदी मोठे टँकर्स आणि चक्क जेसीबी मशीन देखील ऑर्डर केल्याचे समोर आले. अर्ध्या तासात तब्बल १५ वेगवेगळ्या फूड डिलिव्हरी ऑर्डर्स आल्याने ते डिलिव्हरी कर्मचाऱ्यांची आणि त्याची मोठी तारांबळ उडाली.

परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे लक्षात आल्यानंतर व्हीरामाणी याने इन्स्टाग्रामवर एक भावूक व्हिडिओ शेअर करत अशा प्रकारे त्रास न देण्याची गयावया केली. निरपराध कर्मचाऱ्यांना उगाचच लांबचा प्रवास करावा लागत असल्याने आणि स्वतःकडे या वस्तूंचे पैसे भरण्यासाठी नसल्याने हा मानसिक छळ थांबवावा, असे आवाहन त्याने केले. परंतु, तरीही हा त्रास थांबला नाही आणि अज्ञात लोकांकडून त्याला सातत्याने फोन कॉल्स येऊ लागले. इतकेच नव्हे तर, कोणीतरी त्याचा नंबर किडनी दानाच्या चौकशीसाठीही वापरल्याचे उघड झाले. अखेर या सततच्या मानसिक त्रासाला आणि मनस्तापाला कंटाळून त्याला तात्पुरत्या स्वरूपात आपले घर आणि शहर सोडून दुसऱ्या ठिकाणी निघून जाण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला. ही घटना सध्या सोशल मीडियावर मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे.

हेही वाचा
सर्व पहा