नवरात्रीचे नवरंग नेमके ठरवतं कोण?

नवरात्रीत नऊ रंगांचे कपडे का घातले जातात? जाणून घ्या नवग्रहांचे शास्त्र, नवरत्नं आणि आजचा फॅशन ट्रेंड यामागील सविस्तर माहिती.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
नवरात्रीचे नवरंग नेमके ठरवतं कोण?

नवरात्रौत्सव सुरू झाला की, नऊ दिवसांच्या नऊ रंगांची चर्चा प्रत्येक घरात आणि विशेषतः सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर रंगू लागते. दरवर्षी नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची वस्त्रे परिधान करायची, याचे वेळापत्रक आधीच प्रसिद्ध होते. विशेषतः महिला वर्ग आणि तरुणाई हा ट्रेंड अत्यंत उत्साहाने फॉलो करताना दिसते. मात्र, हा नवरंगांचा कोड नेमका कोण ठरवतो आणि या परंपरेला थेट धार्मिक आधार आहे की हा केवळ एक आधुनिक फॅशन ट्रेंड आहे, याविषयी समाजात कायमच उत्सुकता पाहायला मिळते.

या नवरंगांचा संबंध कोल्हापूर येथील श्री छत्रपती शाहूपुरीतील व्यापारी पेठेत असलेल्या श्री अंबाबाई मंदिरातील नवग्रहांच्या मंडपाशी जोडला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्योदयाच्या वेळी ज्या ग्रहाचा 'होरा' असतो, त्या ग्रहाचे नाव त्या वाराला प्राप्त होते. त्यानुसार सात ग्रह त्या त्या वारांचे अधिपती मानले जातात. या नवग्रहांनुसार रविवारी रविला भगवा, सोमवारी चंद्राला पांढरा, मंगळवारी मंगळाला लाल, बुधवारी बुधाला हिरवा किंवा निळा, गुरुवारी गुरूला पिवळा, शुक्रवारी शुक्र ग्रहाला पांढरा किंवा हिरवा आणि शनिवारी शनीला काळा किंवा राखाडी रंग दर्शवला जातो. राहू आणि केतू हे छायाग्रह असल्याने त्यांचे स्वतंत्र वार नसतात. ग्रहांची कृपादृष्टी लाभावी म्हणून त्या दिवशी संबंधित रंगाची वस्त्रे परिधान करण्याचा प्रघात पंचांगात नमूद आहे. याच आधारावर पुढे व्यावसायिक यंत्रणांनी नवरात्रीत नवरंग वापरण्याचा आधुनिक प्रघात रूढ केला.

जरी आजच्या काळात हा रंगांचा कोड एक फॅशन ट्रेंड वाटत असला, तरी इतिहासात डोकावून पाहिल्यास याला जुनी पार्श्वभूमी असल्याचे दिसून येते. थेट पेशवाईच्या काळात नवरात्रीत देवीला दर दिवशी वेगवेगळ्या रंगांच्या साड्या नेसवायची पद्धत होती, असे ऐतिहासिक उल्लेख आढळतात. त्यामुळे पूजेच्या वेळी रंगांचे महत्त्व पूर्वीपासूनच भारतीय संस्कृतीचा एक भाग राहिले आहे.

भारतीय संस्कृतीत नऊ या अंकाचे आणि नवग्रहांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. प्राचीन भारतातील ऋषीमुनींनी मानवी आयुष्यावर प्रभाव टाकणारे नऊ ग्रह अवकाश मंडळात असल्याचे शोधले होते. सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतू हे ते नवग्रह होत. मानवी जीवन आणि निसर्ग यांचा नवग्रहांशी संबंध असल्याचे मानले जाते. या ग्रहांचा प्रभाव संतुलित करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात  सूर्य - माणिक, चंद्र - नैसर्गिकरीत्या तयार झालेला मोती, मंगळ - पोवळं, बुध - पाचू, बृहस्पति - पुष्कराज, शुक्र - नैसर्गिक हिरा, शनी - निलम, राहू - गोमेद, आणि केतू - लसण्याया नवरत्नांचा वापर सांगितला जातो.

एकंदरीत विचार करता, आज नवरात्रीत पाळला जाणारा कलर कोड हा जरी थेट धार्मिक ग्रंथांतील सक्तीचा नियम नसला, तरी तो नवग्रह, इतिहास आणि सांस्कृतिक परंपरेशी जोडलेला आहे. त्यामुळे हा रंगांचा ट्रेंड एक फॅशन आणि उत्साहाचा भाग म्हणून पाळण्यास काहीच हरकत नाही.

हेही वाचा
सर्व पहा