आगशी : झुआरी नदीत (Zuari River, Goa) दांडी, आगशी परिसरात एका इसमाचा मृतदेह तरंगताना आढळल्याने खळबळ उडाली. बेपत्ता असलेल्या तिसवाडी तालुक्यातील नेवरा येथील मंदार मडकईकर यांचा हा मृतदेह असल्याचे तपासात उघड झाले आहे. ८ ऑक्टोबर पासून बेपत्ता असल्याने त्याचा शोध सुरू होता.
नदीत मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळताच आगशी पोलिसांनी (Agacaim Police) घटनास्थळी धाव घेतली. मृताची ओळख त्याच्या चुलत भावाने पटवली. याप्रकरणी आगशी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास सुरू आहे.
मंदार मडकईकर हा गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्याचा शोध घेतला जात होता. अखेर झुआरी नदीत त्याचा मृतदेह आढळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मृतदेह ताब्यात घेऊन आगशी पोलिसांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पीतळात (Goa Medical College Hospital) पाठवला आहे. शवचिकित्सेनंतर यासंदर्भात अधिक माहिती मिळणार असल्याचे आगशी पोलिसांनी सांगितले.


