गोवन वार्ता न्यूज डेस्क
नवी दिल्ली
लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ‘इंडि’ आघाडीने कनॉट प्लेस ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढला. यानंतर मतदार यादी ‘एसआयआर’ प्रक्रियेतील वादाबाबत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, सौगत रॉय, अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव यांच्या नावाने सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या याचिकांसह अशा अनेक याचिकांवर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाकडे निघालेल्या मोर्चात विरोधी पक्षांच्या नेत्यांसह लोकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये राहुल गांधी, प्रियांका गांधी, तेजस्वी यादव, अखिलेश यादव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि इतरांचा समावेश होता. त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात निदर्शने केली. भेटण्यासाठी सरन्यायाधीशांची संमती मिळाली नसतानाही विरोधी पक्षांनी हे आंदोलन पुढे चालू ठेवले. मोर्चापूर्वी राहुल गांधींनी या आंदोलनाबाबत पत्रकार परिषद घेतली.
सरन्यायाधीशांनी भेटीला दिला होता नकार
सरन्यायाधीशांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटण्यास नकार दिला होता. सोमवारी न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी नमूद केले की, प्रत्येक भारतीयाला न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाची दारे सर्वांसाठी खुली आहेत. ‘इंडि’ आघाडीच्या नेत्यांचे भेटीच्या विनंतीचे पत्र रविवारी मिळाले होते. त्याच रात्री त्याला उत्तरही दिले होते. पत्रात शिष्टमंडळाला भेटणे का शक्य होणार नाही, हे स्पष्ट केले होते.
पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले...
‘इंडि’ आघाडीचे नेते मुख्य निडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आणि संविधान वाचवण्याची लढाई सुरूच ठेवणार आहेत.
दिल्लीमध्ये मतांच्या चोरीविरोधात अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दिल्लीचे रूपांतर तुरुंगात का करण्यात आले आहे ? लोकांना राजधानीत पोहचण्यापासून रोखले जात आहे. दिल्ली एका किल्ल्यात रूपांतरित झाली आहे. हजारो पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान तैनात आहेत.
मला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मेसेज येतात. मी त्यांना दिलेल्या रिप्लायमध्ये म्हणालो, माफीचा साक्षीदार व्हा. तुम्ही गुन्हा केला आहे. तुम्ही मुख्य आरोपी नाही. राजीनामा द्या. आम्ही तुम्हाला माफ करण्याबाबत विचार करू शकतो.
ईडी, सीबीआय आणि परराष्ट्र मंत्रालयासह विविध खात्यांतील २०० अधिकारी आमच्या संपर्कात असून ते आम्हाला माहिती देत आहेत.
सरकार मोठी चूक करत आहे. आम्हाला देशाला दाखवून द्यायचे आहे की, पंतप्रधान मोदी हे ज्ञानेश कुमार यांची पाठराखण करत आहेत. त्यांना जेवढे संरक्षण दिले जाईल, तितक्या लवकर आम्ही त्यांच्या ‘नियंत्रका’पर्यंत पोहोचू.
पोलीस कर्मचारी अस्वस्थ आहेत; कारण त्यांना तरुणांना मारहाण करण्याचे आदेश दिले जात आहेत. दुसरीकडे आरएसएस सदस्यांना मात्र मोकळीक दिली जात आहे.
भाजप सरकारकडून संविधानावर हल्ला केला जात आहे. हा लढा सुरूच राहील. ज्ञानेश कुमार राजीनामा का देत नाहीत? ज्ञानेश कुमार, आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आम्हाला तुमच्या भूतकाळाबद्दल आणि भ्रष्टाचाराबद्दल माहिती आहे. आम्ही योग्य वेळेची वाट पाहत आहोत.


