पणजी : गोव्यातून हैदराबाद आणि इतर राज्यांत चालवल्या जाणाऱ्या अवैध ड्रग्स तस्करीच्या एका मोठ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यंत्रणांना यश आले आहे. तेलंगणाच्या 'ईगल फोर्स'ने गोवा पोलिसांच्या सहकार्याने राबवलेल्या एका विशेष मोहिमेत कस्टोडिओ फर्नांडिस उर्फ क्रिस्टी या संशयित ड्रग्स पुरवठादाराला गोव्यातून जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे गोवा आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांतील तस्करांचे धाबे दणाणले आहेत, या नेटवर्कचे धागेदोरे नेमके कुठवर पसरले आहेत, याचा सखोल शोध आता पोलीस यंत्रणा घेत आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता, तेलंगणा 'ईगल फोर्स'चे संचालक संदीप शांडिल्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबादच्या पंजगुट्टा पोलिसांनी काही दिवसांपूर्वी आर. केशव राज सिंग या व्यक्तीला ड्रग्स विक्री करताना रंगेहात पकडले होते. त्याच्या कारच्या डॅशबोर्डमधून पोलिसांनी १३ ग्रॅम एमडीएमए आणि ७ ग्रॅम चरस असा मुद्देमाल जप्त केला होता. या गुन्ह्यारोहीत कसून चौकशी केली असता, केशव राज सिंग याने गोव्यातून कस्टोडिओ फर्नांडिस म्हणजेच 'क्रिस्टी'कडून हे ड्रग्स केवळ ४०,०० रुपयात विकत घेतल्याची आणि ते हैदराबादमध्ये दुप्पट किंमतीला विकणार असल्याची माहिती उघड केली होती. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी या रॅकेटच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पावले उचलली आणि गोवा पोलिसांची मदत घेत हे यश संपादन केले.
तपासादरम्यान पोलिसांच्या हाती मोठे आर्थिक पुरावे लागले आहेत. या संपूर्ण रॅकेटच्या बँक खात्यांची छाननी केली असता, सुमारे ४८ लाख ४० हजार रुपयांच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची नोंद आढळून आली आहे. क्रिस्टीचे साथीदार विशेष करून गोव्याहून हैदराबादला प्रवास करून ग्राहकांना माल पोहोच करत असत, तेथून रोख रक्कम गोळा करून ती क्रिस्टीच्या खात्यात जमा केली जात होती. या आर्थिक व्यवहारांच्या आणि मोबाईल कॉल डेटाच्या आधारे तपास केला असता, तेलंगणातील २५ हून अधिक संशयितांची नावे समोर आली आहेत. या सर्व व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्या खात्यावरील व्यवहारांची आणि या ड्रग्स नेटवर्कमधील सहभागाची कसून पडताळणी केली जात असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच, या आंतरराज्यीय रॅकेटमध्ये गोव्यातून कार्यरत असणाऱ्या 'निग्गी' नावाच्या एका नायजेरियन नागरिकाचा संशयास्पद सहभाग असल्याचा मुद्दाही समोर आला आहे. हा नायजेरियन नागरिक गोव्यात बसून स्थानिक भारतीय साथीदारांच्या मदतीने ड्रग्सच्या डिलिव्हरीचे समन्वय साधत असल्याचा संशय असून, पोलीस त्या दिशेनेही कसून तपास करत आहेत. गोव्याचे पर्यटन आणि किनारी भाग ड्रग्स तस्करांचा अड्डा बनत चालल्याच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांची ही संयुक्त कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई वेगाने सुरू आहे.


