म्हापसा : म्हापसा येथील कोर्ट जंक्शन (Mapusa Court Junction) जवळ खासगी प्रवासी बसने ठोकर देत दुचाकीला ५० मीटर अंतरावर ओढत नेले. या अपघातात दुचाकीस्वार दिवाराम कुमार (३३, कुचेली म्हापसा) हा गंभीर जखमी झाला. घटनेनंतर बस चालकाला जमावाकडून चोप देण्यात आला.
वरील अपघात आज सोमवारी ९.१० च्या सुमारास घडला. साखळीहून म्हापसा बस स्थानकावर जाणारी ही जीए ०३ एन ९९६६ क्रमांकाची प्रवासी बस बस कोर्ट जंक्शनवरून जात असताना उतरणीवर समोरून जाणाऱ्या दुचाकीला धडकली. या अपघातानंतर बसने दुचाकीला सुमारे ५० मीटरवर ओढत नेले. धडक बसताच जखमी दुचाकीस्वार रस्त्याच्या बाजूला कोसळला. त्यामुळे सुदैवाने तो बसखाली चिरडण्यापासून वाचल्याची माहिती बघ्यांनी दिली.
जखमीला रुग्णवाहिकेतून म्हापसा जिल्हा इस्पितळात (Mapusa District Hospital) उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्याचा पाय फ्रॅक्चर झाला असून; त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातास कारणीभूत असलेल्या बस चालकाला जमावाने पकडून चोप दिला. पोलिसांनी त्याची जमावाच्या तावडीतून सुटका करून ताब्यात घेतले. पुढील तपास म्हापसा पोलीस (Mapusa Police) करत आहेत.


