पोकेवाडा-मोरजीतील सरकारी शाळेवर झाड पडून छपराची हानी

अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना रंगमंचाचा आधार : तातडीने दुरुस्तीची मागणी

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
23 mins ago
पोकेवाडा-मोरजीतील सरकारी शाळेवर झाड पडून छपराची हानी

पोकेवाडा-मोरजी येथील सरकारी शाळेची दुरवस्था.

पेडणे : पोकेवाडा-मोरजी येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या इमारतीवर मागील महिन्यात मोठे झाड कोसळल्याने छपराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. छपराची अद्याप दुरुस्ती न झाल्याने अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. शाळेच्या इमारतीची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी पालक आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.
झाड कोसळल्याने इमारतीच्या अर्ध्याहून अधिक छपराची पडझड झाली आहे. ही घटना रात्री घडल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, दिवसा झाड कोसळले असते, तर चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असता.
दरम्यान, या घटनेमुळे सध्या अंगणवाडीचे विद्यार्थी रंगमंचावर बसून दिवस काढत आहेत. लहान मुलांच्या शिक्षणासाठी सुरक्षित आणि योग्य सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असताना, त्यांना अशा परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागत असल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून छपराची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी पुढे येत आहे.
आमदारांच्या पुढाकाराने झाड हटवले
घटनेनंतर पेडणे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, झाड कापण्यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध नसल्याने ते रात्रभर तसेच पडून राहिले. दुसऱ्या दिवशी स्थानिक आमदार जीत आरोलकर यांनी पुढाकार घेत झाड कापून हटवण्याची व्यवस्था केली. मात्र, छपराची दुरुस्ती अद्याप झालेली नसल्याने पालक आणि नागरिकांमध्ये नाराजी आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून सरकारने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा
सर्व पहा