पेडणे : कोरगाव येथील वडिलोपार्जित घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून एका कुटुंबाचा घरातील प्रवेश रोखल्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. संबंधितांनी सीसीटीव्ही, डीव्हीआर व अन्य मालमत्तेचे नुकसान केले आणि गंभीर परिणामांची धमकी दिली, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देऊळवाडा कोरगाव येथील रहिवासी किरण रामचंद्र कोरगावकर (वय ५९) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. घटना १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास पेठेचावाडा, कोरगाव येथील कमळेश्वर मंदिराजवळ घडल्याचे नमूद आहे.
कोरगाव गावातील सर्व्हे क्रमांक २/९ मध्ये असलेल्या वडिलोपार्जित घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला संबंधितांनी कुलूप लावले. त्यामुळे तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना घरात प्रवेश करता आला नाही, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याशिवाय तक्रारदारांचे सीसीटीव्ही, डीव्हीआर आणि इतर मालमत्ता व सामानाचे नुकसान केल्याचा, तसेच गंभीर परिणामांची धमकी दिल्याचाही आरोप आहे.
या प्रकरणात प्रभात शशिकांत कोरगावकर, नरेंद्र कोरगावकर आणि श्वेता नरेंद्र कोरगावकर (तिघेही रा. पेठेचावाडा, कोरगाव), सुजाता नाईक (रा. पणजी), दीपिका दिलीप कामुलकर आणि दिलीप कामुलकर (दोघेही रा. गोरेगाव पश्चिम, मुंबई), तसेच सदानंद कोरगावकर (रा. कुरारा गाव, मालाड, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पेडणे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आदित्य गाड करीत आहेत.


