चोडण येथे टाकीची साफसफाई करताना मजुरांवर मधमाश्यांचा हल्ला

डिचोली अग्निशामक दलाकडून टाकीत अडकलेल्या मजुरांची सुटका

Story: गोवन वार्ता। वार्ताहर |
07th October, 11:50 pm
चोडण येथे टाकीची साफसफाई करताना मजुरांवर मधमाश्यांचा हल्ला

टाकीत अडकलेल्या मजुरांची सुटका केल्यानंतर जखमी मजुराची विचारपूस करताना अग्निशामक दलाचे जवान.

डिचोली :
बेलाभाट-चोडण येथे रहिवासी इमारतीची पाण्याची टाकी साफ करण्यासाठी उतरलेल्या दोन मजुरांवर मधमाश्यांनी अचानक हल्ला केल्याने ते टाकीतच अडकले. डिचोली अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सुरक्षित बचावकार्य करत दोन्ही मजुरांची सुटका केली.
खासगी निवासी प्रकल्पाच्या टॉवरवरील पाण्याच्या टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल साचला होता. तो साफ करण्यासाठी कमल होली (२७, रा. हरियाणा) आणि संजीत लोहरा (३०, रा. झारखंड) हे दोघे टाकीत उतरले होते. यावेळी टाकीजवळील पोळ्यातील मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. मधमाशांच्या चाव्यामुळे दोघेही जखमी व अस्वस्थ झाल्याने त्यांना टाकीतून बाहेर पडता आले नाही.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे अधिकारी व जवान घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला संरक्षणात्मक पोशाख देण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र मधमाशांच्या हल्ल्यामुळे जखमी झालेल्या मजुरांना त्यास प्रतिसाद देता आला नाही. त्यानंतर जवानांनी सुरक्षा बेल्टच्या मदतीने दोघांनाही टाकीतून बाहेर काढले.
चालक अमोल नाईक यांनी टॉवरवर चढून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने बचावकार्य पूर्ण करण्यात आले. सुटका केलेल्या दोन्ही मजुरांना १०८ रुग्णवाहिकेतून प्राथमिक उपचारासाठी पाठविण्यात आले.
अग्निशामक जवानांची कामगिरी
या बचावकार्यात अधिकारी शिवाजी नाईक, उपअधिकारी बी. डी. गावकर, चालक अमोल नाईक तसेच जवान आशिष मोरलेकर, रुपेश गावस, युवराज गावकर, आनंद नाईक, रुपेश पळ, गौरेश मांद्रेकर आणि निषिद पिल्ले यांनी सहभाग घेतला.

हेही वाचा
सर्व पहा