म्हापसा : कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील कैदी विकट भगत याच्यावरील खुनी हल्ला प्रकरणी पोलिसांनी संशयितांपैकी तीन कैद्यांना अटक केली आहे. यामध्ये बाबू बालेकर, रामकृष्ण बालेकर व मंथन च्यारी यांचा समावेश असून न्यायालयाच्या परवानगीनंतर इतर कैद्यांनाही पोलीस अटक करणार आहेत.
शनिवार, २१ रोजी कोलवाळ पोलिसांनी म्हापसा न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर तिन्ही संशयित कैद्यांना अटक केली आहे. संशयितांना म्हापसा येथील प्रथमश्रेणी न्यायालयाने प्रत्येकी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, ही खुनी हल्ल्याची घटना बुधवार, १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.४२ वा. सुमारास कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात घडली होती. पूर्ववैमनस्यातून आरोपी कैद्यांनी कैदी विकट भगत याच्यावर हल्ला करण्याचा कट रचला होता. या कटाचा भाग म्हणून, त्यांनी कारागृहाच्या अतिसुरक्षित विभागाच्या प्रवेशद्वारावर तैनात असलेले कारागृह वॉर्डन जयेश गावकर यांना ओलीस धरले आणि प्रतिबंधित क्षेत्रात बळजबरीने प्रवेश केला.
न्यायालयाच्या व्हिडिओ कॉन्फरन्स सुनावणीनंतर एक कैदी अतिसुरक्षित विभागात जात होता. याचा फायदा घेत आरोपी कैद्यांनी विभागाच्या आवारात प्रवेश केला. तिथे असलेल्या विकट भगतवर त्यांनी हल्ला चढवला. आरोपींनी भगतवर जीवघेणा हल्ला केला, यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. कारागृह प्रशासनाच्या लक्षात ही घटना येताच त्यांनी हस्तक्षेप केला आणि जखमी कैद्याला म्हापसा जिल्हा इस्पितळात हलवले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्याला बांबाेळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळात पाठवण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी कारागृहाचे उपअधीक्षक अनिल गावकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, संशयित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, ६१ (२), १०९ (१) अन्वये गुन्हा नोंद केला होता. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामचंद्र साटेलकर हे पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, कैदी विकट भगत हा २०१७ मध्ये काणकोण येथे एका विदेशी नागरिक महिलेवरील बलात्कार आणि तिच्या हत्येच्या गुन्ह्याखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
टारझन पार्सेकर, मंथन च्यारीकडून हल्ला
आकाश मुदराज, टारझन पार्सेकर, सागर पाटील, बाबू बालेकर, झाकिऊल्ला खाझी, रामकृष्ण बालेकर, पीटर, व्यंकटेश स्वामी, अफलान, मंथन च्यारी यांच्यासह इतर कैद्यांनी भगत याच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार केला. यामुळे विकट भगत याला गंभीर दुखापत झाली होती.


