हरमलमध्ये कुंड्यांत फुलवली गांजाची ९ झाडे; एकाला अटक

३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, ४८ वर्षीय व्यक्तीला अटक

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
19th November, 12:00 am
हरमलमध्ये कुंड्यांत फुलवली गांजाची ९ झाडे; एकाला अटक

पेडणे : हरमल येथील खालचावाडा परिसरात मांद्रे पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कारवाई करत गांजाची बेकायदेशीर लागवड उघडकीस आणली आहे. रॉकटॉप गेस्ट हाऊस येथे भाड्याने घेतलेल्या जागेत कुंड्यांमध्ये गांजाची तब्बल ९ झाडे लावल्याचे पोलिसांच्या छाप्यात आढळून आले. या झाडांची अंदाजे किंमत ३ लाख ६० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मांद्रे पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रतीक गरुडी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे १८ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे १.३० ते ३.१५ या वेळेत दोन पंच आणि पोलीस पथकाच्या उपस्थितीत ही धडक कारवाई करण्यात आली.

कारवाईदरम्यान जोएल जोसेफ डिसोझा (वय ४८, मूळ रा. मालाड पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र) याला गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून गांजाची ९ झाडे जप्त करून पंचनाम्याद्वारे जप्तीची प्रक्रिया पूर्ण केली.

याप्रकरणी मांद्रे पोलीस स्थानकात गुन्हा क्रमांक १०१/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम २०(अ)(i) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी संशयिताची चौकशी केल्यानंतर त्याला अटकेची कारणे आणि जामिनाचा अधिकार यांची माहिती देऊन १८ नोव्हेंबर रोजी पहाटे ४.२३ वाजता अटक केली.

या प्रकरणाचा पुढील तपास मांद्रे पोलीस करत आहेत.

मांद्रे पोलिसांच्या या कारवाईमुळे हरमल परिसरातील अमली पदार्थांच्या बेकायदेशीर लागवडीचा प्रकार उघडकीस आला असून, अशा गैरप्रकारांविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. 

हेही वाचा
सर्व पहा