सुरावलीतील हल्लाप्रकरणी मुख्य संशयिताला अटक

आतापर्यंत चारजणांना अटक : अजून एकजण पसार

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
17th November, 11:30 pm
सुरावलीतील हल्लाप्रकरणी मुख्य संशयिताला अटक

मडगाव : सुरावली येथे पूर्ववैमनस्यातून रसूल शेख या तरुणावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी कोलवा पोलिसांनी मुख्य संशयित शंकर शिल्लिकिथर (२२, मूळ बेळगाव, कर्नाटक) याला कर्नाटकातून अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत चार संशयितांना अटक करण्यात आली असून, आणखी एक संशयित पसार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास सुरावली येथील बास्किन रॉबिन्स आइस्क्रीम पार्लरजवळून रसूल शेख हा तरुण जात असताना संशयितांनी त्याचा पाठलाग केला. पूर्ववैमनस्यातून त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर आणि पाठीवर लोखंडी रॉडने जोरदार मारहाण करण्यात आली. यावेळी त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या हल्ल्यात रसूल गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी जखमीचा भाऊ मलिक शेख यांनी कोलवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित करण लमाणी राठोड (रा. बाणावली), अमन कुमार (रा. तिसरा वॉर्ड, कोलवा, मूळ बिहार) आणि रॉबिन माथूर (रा. एकलाटे, कुडतरी) या तिघांना अटक केली होती. तपासादरम्यान करण राठोड याने दिलेल्या माहितीच्या आधारे हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला लोखंडी रॉड आणि पांढर्‍या रंगाची दुचाकी पोलिसांनी जप्त केली. त्यानंतर या प्रकरणातील मुख्य संशयित शंकर शिल्लिकिथर याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तो कर्नाटकातील बेळगावचा रहिवासी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कर्नाटकात जाऊन रात्री उशिरा त्याला अटक केली. त्याला गोव्यात आणून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. या अटकेमुळे प्रकरणातील अटक केलेल्या संशयितांची संख्या चार झाली आहे. आणखी एक संशयित अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत आयुष, मडगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी गुरुदास कदम आणि कोलवा पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

मुख्य संशयिताला अटक

या प्रकरणातील मुख्य संशयित शंकर शिल्लिकिथर याचा पोलिसांकडून शोध घेण्यात आला. तो कर्नाटकातील बेळगावचा रहिवासी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक तेथे गेले. त्याला अटक करून गोव्यात आणण्यात आले. यानंतर त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. 

हेही वाचा
सर्व पहा