श्री रुद्रेश्वर देवस्थान निवडणुकीच्या मतदानापूर्वी पात्र महाजनांची पडताळणी

हरवळे येथील रुद्रेश्वर देवस्थानच्या निवडणुकीत पात्र महाजनांची पडताळणी २२ नोव्हेंबर रोजी मतदानापूर्वी केली जाणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दरम्यान, रॉय रवी नाईक यांचे नाव पात्र महाजनांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही.

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
just now
श्री रुद्रेश्वर देवस्थान निवडणुकीच्या मतदानापूर्वी पात्र महाजनांची पडताळणी

पणजी : हरवळे येथील रुद्रेश्वर देवस्थानच्या निवडणुकीत पात्र महाजनांची पडताळणी २२ नोव्हेंबर रोजी मतदानापूर्वी केली जाणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दरम्यान, रॉय रवी नाईक यांचे नाव पात्र महाजनांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही.
न्यायालयाच्या आदेशानुसार पात्र महाजनांची यादी तयार करण्यात आली आहे. अॅडज्युडिकेटिंग अधिकाऱ्यांनी ही यादी तयार करून २२ ऑक्टोबर रोजी तिची अधिसूचना जारी केली होती. त्यामुळे आता या यादीत बदल करणे शक्य नसल्याची माहिती डिचोलीचे उपजिल्हाधिकारी शुभम नाईक यांनी दिली.
हरवळे येथील रुद्रेश्वर देवस्थानची निवडणूक २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी १,७२८ महाजनांची पात्र मतदार म्हणून यादी जाहीर करण्यात आली आहे.
महाजनांमधील वादामुळे रुद्रेश्वर देवस्थानची निवडणूक लांबणीवर पडली होती. २०२५ ते २०२८ या कार्यकाळासाठीची निवडणूक यापूर्वीच होणे अपेक्षित होते. मात्र महाजन म्हणून पात्रता आणि मतदार यादीवरून न्यायालयात वाद सुरू असल्याने निवडणुकीला विलंब झाला. आता डिचोलीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेच्या निकालावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.

मतदानानंतर लगेचच मतमोजणी

- डिचोलीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुकीची नोटीस जारी केली आहे. त्यानुसार, उमेदवारी अर्ज २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत सादर करता येतील.
- त्यानंतर दुपारी ३ ते ५ या वेळेत अर्जांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत असेल. त्यानंतर तीन तासांनी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल.
- २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. याच दिवशी सकाळी ८ ते ९ या वेळेत मतदारांची नोंदणी आणि पडताळणी केली जाईल. मतदान पूर्ण झाल्यानंतर लगेचच मतमोजणी होणार आहे.