राज्यात महागाईचा दर वाढला

१५ महिन्यातील सर्वाधिक महागाईचा दर; ऑक्टोबर महिन्यात राज्यातील ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर वाढून ४.५८ टक्के झाला. हा मागील पंधरा महिन्यातील गोव्यातील सर्वाधिक महागाई दर ठरला आहे.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
9 hours ago
राज्यात महागाईचा दर वाढला

पणजी : ऑक्टोबर महिन्यात राज्यातील ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर वाढून  ४.५८ टक्के झाला. हा मागील पंधरा महिन्यातील गोव्यातील सर्वाधिक महागाई दर ठरला आहे.

संपूर्ण देशात महागाई दर कमी असण्यात गोवा सातव्या स्थानी राहिला. गोव्याच्या महागाई दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी राहिला. ऑक्टोबर महिन्यात देशातील महागाई दर वाढून ६.०९ टक्के झाला. प्रामुख्याने इंधन, अन्नधान्य आदींच्या किमती वाढल्याने सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर मधील राष्ट्रीय महागाई दरात वाढ झाली आहे.

देशाचा ऑक्टोबर महिन्यातील महागाई दर मागील दोन वर्षातील सर्वाधिक महागाई दर ठरला आहे.

देशाचा महागाई दर आरबीआयने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक आहे. केंद्रीय सांख्यिकी आणि अंमलबजावणी खात्याच्या अहवालानुसार गोव्यात ऑक्टोबर महिन्यात ग्रामीण भागात महागाई दर ४.३३ टक्के तर शहरी भागात ४.७२ टक्के राहिला. गोव्यात सप्टेंबर महिन्यात महागाई दर ३.९२ टक्के होता.

ऑगस्टमध्ये ३.५६ टक्के, जुलैमध्ये ३.३५ टक्के, जूनमध्ये ३.१ टक्के होता. ऑक्टोबर मध्ये मिझोरम येथील महागाई दर देशात सर्वात कमी म्हणजेच २.८५ टक्के होता.

यानंतर मेघालय (३.६३ टक्के), नागालँड (३.६६ टक्के),,हिमाचल प्रदेश (४.२७ टक्के), अरुणाचल प्रदेश ( ४.३३ टक्के), हरियाणा (४.३८ टक्के) यांचा क्रमांक लागतो. तर तामिळनाडू मधील महागाई दर सर्वाधिक म्हणजेच ७.२९ टक्के राहिला. याशिवाय तेलंगणा (७.२६ टक्के), आंध्र प्रदेश (७.२५ टक्के),  मध्य प्रदेश (७.१९ टक्के), ओडिशा (७.१७ टक्के) या राज्यातील महागाई दर तुलनेने अधिक होता. केंद्र शासित प्रदेशात दिल्लीमधील महागाई दर सर्वात कमी म्हणजेच ३.८० टक्के होता. तर लडाख मधील महागाई दर ६.३४ टक्के होता.

हेही वाचा
सर्व पहा