पणजी : कोकणीसह २२ अनुसूचित भारतीय भाषांमध्ये द्विभाषिक शैक्षणिक साहित्य आणि माहिती उपलब्ध करून देणारे ‘भाषास्नॅप’ ॲप गोवा विद्यापीठातील शिक्षण आणि संशोधन क्षेत्रासाठी वरदान ठरणार आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांनी या ॲपचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोवा विद्यापीठात पीएम-उषा (PM-USHA) आणि रुसा २.० उपक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेल्या ‘भाषास्नॅप’ वेब ॲपचे अनावरण करण्यात आले. यावेळी सुमारे २८.५५ कोटी रुपयांच्या शैक्षणिक आणि संशोधनविषयक सुविधांचे लोकार्पण करण्यात आले. गोवा बिझनेस स्कूलमधील संगणक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या नवीन इमारतीचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. तसेच स्कूल ऑफ केमिकल सायन्सेसमधील रोबोटिक्स अँड आयओटी लॅब आणि मशीन लर्निंग लॅबसारख्या अत्याधुनिक संशोधन सुविधांचेही लोकार्पण करण्यात आले.
सुमारे २८.५५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारण्यात आलेल्या या सुविधांमुळे गोवा विद्यापीठाची शैक्षणिक आणि संशोधनविषयक पायाभूत व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. तसेच विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधकांसाठी नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
शिक्षण अधिक सर्वसमावेशक आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने ‘भाषास्नॅप’ हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. कोकणीसह २२ अनुसूचित भारतीय भाषांमध्ये द्विभाषिक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी हे ॲप विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीच्या भाषेत शैक्षणिक साहित्य आणि संसाधनांचा लाभ घेता येणार आहे. या उपक्रमात पुढाकार घेणारे गोवा हे अग्रणी राज्य असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
सामंजस्य कराराची देवाणघेवाण
भारत-पोर्तुगाल ट्विनलॅब भागीदारीअंतर्गत गोवा विद्यापीठ आणि पोर्तुगालमधील पोर्तो विद्यापीठाच्या बायोपोलिस-सिबिओ यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराच्या देवाणघेवाणीलाही मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली. या करारामुळे जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण आणि संवर्धन, परिसंस्थेचे निरीक्षण तसेच पर्यावरणीय शाश्वतता या क्षेत्रांतील आंतरराष्ट्रीय संशोधन, वैज्ञानिक ज्ञानाची देवाणघेवाण आणि क्षमता बांधणीला चालना मिळणार आहे.
या कार्यक्रमात इलेक्ट्रिक बसेसचे उद्घाटन करण्यात आले. तसेच गोवा विद्यापीठाच्या ई-मासिकाचे प्रकाशनही करण्यात आले. नवोन्मेष आणि शाश्वत विकासाप्रती गोवा विद्यापीठाची असलेली बांधिलकी या ई-मासिकातून अधोरेखित होते.


