विदेशी फंडिंगवरून चालणारी झुंडशाही खपवून घेणार नाही!

देशात केवळ गांधी परिवाराचे ‘फॅमिली राज’ चालत होते. तो काळ लोकशाहीसाठी काळा काळ होता. मात्र, २०१४ नंतर केंद्रात भाजप सरकार आले आणि मागील बारा वर्षांच्या काळात भाजप सरकारने अनेक विकासकामे करत लोकोपयोगी योजना सुरू केल्या. यामुळे जनतेने तीन वेळेस भाजपला निवडून दिले, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
just now
विदेशी फंडिंगवरून चालणारी झुंडशाही खपवून घेणार नाही!

पणजी : काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा लोकशाही मार्गांवर विश्वास नाही. मात्र विदेशी फंडिंगवर सुरू असलेली ही झुंडशाही खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.
मंगळवारी पणजीत काढण्यात आलेल्या ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व अन्य मंत्री, आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. चर्च स्क्वेअर ते आझाद मैदान दरम्यान ही पदयात्रा काढण्यात आली.
देशात केवळ गांधी परिवाराचे ‘फॅमिली राज’ चालत होते. याच पक्षाने १९७५ मध्ये आणीबाणी लादली, राजकीय नेत्यांसह अनेकांची धरपकड केली. तो काळ लोकशाहीसाठी काळा काळ होता. मात्र, २०१४ नंतर केंद्रात भाजप सरकार आले आणि मागील बारा वर्षांच्या काळात भाजप सरकारने अनेक विकासकामे करत लोकोपयोगी योजना सुरू केल्या. यामुळे जनतेने तीन वेळेस भाजपला निवडून दिले, असे मुख्यमंत्री म्हणाले.

काँग्रेसला पराभव दिसल्याने लोकशाही संस्थांवर टीका
काँग्रेसला आपण पुन्हा सत्तेत येणार नाही हे समजले असल्यानेच ते अन्य मार्गांचा वापर करत आहेत. आधी त्यांनी ईव्हीएमला विरोध केला, पण काही राज्यांत ईव्हीएम असूनही त्यांचे सरकार विजयी झाले, तेव्हा ते गप्प बसले. त्यांनी मतपेटीद्वारे मतदान घेण्याची मागणी केली, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतपत्रिकेद्वारेही भाजपच विजयी ठरला. आता त्यांना मुद्दे सापडत नसल्याने निवडणूक आयोग आणि न्यायदान करणाऱ्या संस्थांवर ते टीका करत आहेत, असे सावंत यांनी सांगितले.

परराज्यातील लोकांकडून अनावश्यक घोषणा : गोव्यातील युवकांनी आपल्या मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने जरूर आंदोलन करावे. मात्र, अशा आंदोलनात अन्य राज्यांतील लोक येतात आणि तोंड लपवून अनावश्यक घोषणा देतात, याला आमचा विरोध असेल, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले.

मुख्यमंत्र्यांचा दहशतवाद, नक्षलवादावर प्रहार
१) जम्मू-काश्मीरसाठी भाजपने केलेल्या संघर्षाचा उल्लेख करताना डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानाची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली. तसेच २०१३ मध्ये अनुराग ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील तिरंगा यात्रेत गोव्यातील सुमारे दीडशे युवक सहभागी झाल्याचेही त्यांनी सांगितले.
२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दहशतवाद आणि नक्षलवादाविरोधात कठोर कारवाई करण्यात आल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी सर्जिकल स्ट्राइकचा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली नक्षलवाद संपविण्याच्या दिशेने झालेल्या कामाचा उल्लेख केला.

पंतप्रधानांचा गोव्याबद्दलचा आदर
राहुल गांधी यांच्या वर्तनावर टीका करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वशैलीचे उदाहरण दिले. बंगळुरू येथे वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवताना पंतप्रधानांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही सोबत घेत सन्मान दिल्याचे त्यांनी नमूद केले.