पणजी : रायबंदर येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले. या प्रकरणातील निलंबित पोलीस निरीक्षक विकास देयकर याला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे सोमवार, १६ रोजी म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
मुरगाव तालुक्यातील पीडित मुलीने विकास देयकर याने २५ जुलै आणि २७ ऑक्टोबर रोजी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीनंतर जुने गोवा पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक अंजली धुळपकर यांनी देयकर आणि संबंधित महिलेविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉक्सो) २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी पोलिसांनी देयकर आणि संबंधित महिलेला नोटीस जारी करून चौकशी केली. त्यात त्यांच्या जबाबात तफावत आढळल्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी त्या दोघांना अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने टप्प्याटप्प्याने एक, चार आणि सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी त्या दोघांची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्या दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याच दरम्यान देयकर याला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्याला सोमवारी म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात दाखल केला. दरम्यान देयकर आणि संबंधित महिलेने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असून त्यावर पुढील सुनावणी १८ नोव्हेंबर रोजी होणार आहे.


