म्हापसा : चारवर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी संशयित आरोपीला अटक झाल्यानंतर, गुन्हा घडल्याचे सांगितले जात असलेली म्हापसा येथील जुनी व बेवारस इमारत सील करण्यासाठी म्हापसा पोलिसांनी पावले उचलली आहेत. यासंदर्भात पोलिसांनी म्हापसा नगरपालिकेकडे पत्रव्यवहार केला असून, इमारतीची मालकी आणि सद्यस्थितीची माहिती मागवली आहे. या घटनेमुळे शहरातील धोकादायक आणि दुर्लक्षित इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
म्हापसा पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांनी सांगितले की, इमारत सील करण्याची मागणी करणारे पत्र नगरपालिकेचे मुख्याधिकारी कौशिक देसाई यांना पाठविण्यात आले आहे. तसेच इमारतीच्या मालकी हक्कासह तिच्या सद्यस्थितीबाबतची माहितीही मागविण्यात आली आहे.
मात्र, अशा बेवारस आणि मोडकळीस आलेल्या इमारती सील करणे किंवा सुरक्षित करणे नगरपालिकेसाठी सोपे नाही. असुरक्षित घोषित केलेल्या इमारतींवर कारवाई करताना कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणी येत असल्याचे मुख्याधिकारी देसाई यांनी स्पष्ट केले.
पावसाळ्यापूर्वी नगरपालिकेने धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले होते. त्यानुसार, संबंधित इमारत मालकांना नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. मात्र, काही प्रकरणांत संबंधितांनी मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशांविरोधात न्यायाधिकरणात धाव घेऊन स्थगिती मिळवली आहे. त्यामुळे पुढील कारवाई रखडली असल्याचे देसाई यांनी सांगितले.
जुन्या नगरपालिकेसमोरील सफारी इमारतीचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, या इमारतीसंदर्भात न्यायालयीन स्थगिती मिळाली असून, ती इमारत रिकामी करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.
काही प्रकरणांत भाडेकरूंनी इमारत सील करण्यास किंवा पाडण्यास विरोध केला आहे. काही भाडेकरूंनी स्वतःच्या खर्चाने इमारतीची दुरुस्ती करण्याची तयारीही दर्शवली आहे. त्यामुळे इमारत मालकांना इमारत पाडायची असताना भाडेकरूंना दुरुस्ती करून तेथेच राहायचे असल्यास गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होते, असे देसाई यांनी सांगितले.
अशा प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी नगरपालिका नियमित सुनावण्या घेत असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत निर्णय लवकर घेण्याचा प्रयत्न करीत आहे. काही प्रकरणांत धोकादायक इमारतींच्या वीजजोडण्या तोडण्याची मागणीही संबंधित विभागाकडे करण्यात आली आहे.
डेम्पो मॅन्शन इमारतीसंदर्भातही घटनेपूर्वीच नगरपालिकेत कार्यवाही सुरू होती. याप्रकरणी सुनावण्या घेण्यात आल्या असून, इमारत मालक आणि भाडेकरूंना आवश्यक अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते, असे देसाई यांनी स्पष्ट केले.
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
म्हापसा शहराच्या मध्यवर्ती भागातील बेवारस आणि मोडकळीस आलेल्या इमारतींमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा इमारती गुन्हेगारी कृत्यांसाठी वापरल्या जाण्याची किंवा सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, संभाव्य दुर्घटना अथवा गुन्हे घडण्यापूर्वीच अशा वास्तू सुरक्षित करण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.


