नुवे येथे दोन दुचाकींची धडक, एकाचा मृत्यू, एक जखमी

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
13th November, 11:39 pm
नुवे येथे दोन दुचाकींची धडक, एकाचा मृत्यू, एक जखमी

मडगाव : नुवे चर्चजवळ गुरुवारी सकाळी दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीचालक जखमी झाला. आंतानिओ रॉड्रिग्ज (रा. नुवे) असे मृताचे नाव आहे. जखमी दुचाकीस्वाराचे नाव गिरीश कारेकर असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात घडला. आंतानिओ रॉड्रिग्ज हे होंडा ॲक्टिव्हा स्कूटरने जात असताना त्यांनी नुवे चर्चजवळ वेर्णाच्या दिशेने जाण्यासाठी अचानक उजव्या बाजूला वळण घेतले. यावेळी वेर्णाच्या दिशेने जाणाऱ्या गिरीश कारेकर यांच्या हिरो मेस्ट्रो स्कूटरला त्यांच्या स्कूटरची धडक बसली.

या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळून जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना रॉड्रिग्ज यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी मायना- कुडतरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक नारायण पिंगे पुढील तपास करत आहेत. 

हेही वाचा
सर्व पहा