मडगाव : दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण बैठकीत जिल्ह्यातील पारंपरिक विहिरींच्या पाण्याची गुणवत्ता तपासणे, विहिरींची स्वच्छता करणे तसेच चेतना विशेष शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देत त्यांना आर्थिक मदत करण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. याशिवाय जिल्हा पंचायत सदस्यांचे मानधन आणि विकासकामांसाठीचा निधी वाढविण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली.
जिल्ह्यातील पारंपरिक विहिरींचा पाणीपुरवठ्यासाठी पुन्हा उपयोग व्हावा, या उद्देशाने त्यांच्या पाण्याची गुणवत्ता तपासून आवश्यक स्वच्छता करण्याचा निर्णय घेण्यात आला. विहिरींचे पाणी वापरण्यायोग्य असल्याची खात्री करून त्यांचा उपयोग वाढविण्यावर यावेळी भर देण्यात आला.
चेतना विशेष शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कलाकौशल्यातून तयार केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळवून देण्याचा ठरावही संमत करण्यात आला. या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीतून आर्थिक हातभार लागावा, यासाठी आवश्यक सहकार्य करण्यावर सदस्यांनी भर दिला. जिल्हा पंचायत सदस्यांना मिळणारे मानधन वाढविण्याबरोबरच प्रत्येक मतदारसंघातील विकासकामांसाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सदस्यांनी केली. विकासकामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या तसेच निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांविरोधात कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
जिल्ह्यातील विकासकामांचा दर्जा सुधारण्याबरोबरच सामाजिक उपक्रमांना चालना देणे आणि मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे या विषयांवर बैठकीत भर देण्यात आला.
झेडपी भवनासाठी प्रयत्न व्हावेत!
दक्षिण गोवा जिल्हा पंचायत भवनासाठी अद्याप स्वतंत्र जागा निश्चित झालेली नसल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. त्यामुळे नवीन इमारतीसाठी जागा मिळेपर्यंत सध्याच्या कार्यालयाचा विस्तार करून सदस्य आणि नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.


