यंदाच्या इफ्फीमध्ये ८७ देशांच्या २४९ चित्रपटांचे प्रदर्शन : मुख्यमंत्री

राज्यात २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या ५७ व्या इफ्फीसाठी १३७ देशांनी चित्रपट पाठवले होते. महोत्सवात यातील ८७ देशांचे १५९ चित्रपट दाखवण्यात येतील.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
40 mins ago
यंदाच्या इफ्फीमध्ये ८७ देशांच्या २४९ चित्रपटांचे प्रदर्शन : मुख्यमंत्री

पणजी : राज्यात २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या ५७ व्या इफ्फीसाठी १३७ देशांनी चित्रपट पाठवले होते. महोत्सवात यातील ८७ देशांचे १५९ चित्रपट दाखवण्यात येतील. शिवाय ७६ भारतीय आणि १४ गाला प्रीमियम चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. (The 57th International Film Festival of India (IFFI) will be held in Goa from November 20 to November 28, 2026).

इफ्फीच्या प्रतिनिधी नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ७ हजारहून अधिक प्रतिनिधींची नोंदणी झाल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिली. शुक्रवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार डिलायला लोबो,  केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव चंचल कुमार , एनएफडीसीचे जी. कृष्णकुमार, महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही इफ्फीचे आयोजन करण्यात आम्ही उत्साही आहोत. हा महोत्सव जागतिक सांस्कृतिक क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. यंदा इफ्फीची थीम ‘स्टोरी विदाऊट बॉर्डर’ अशी आहे. महोत्सवाची सुरुवात पोलिश चित्रपट फादरलँडने होणार आहे. तर इफ्फीच्या मध्यावर रोमेनियन चित्रपट ‘आय मॅटर’ दाखवला जाईल. समारोपाला सिंगापूरचा ‘वी ऑल आर स्ट्रेंजर’ दाखवण्यात येईल. महोत्सवात कंट्री फोकस विभागात स्पेन देशातील चित्रपट दाखवले जातील. तसेच रशिया पार्टनर कंट्री असणार आहे.

महोत्सवाच्या इंडियन पॅनोरमा विभागात २५ आणि नॉन फिचर विभागात २० चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.

इंडियन पॅनोरमा विभागाचे उद्घाटन धुरंदर चित्रपटाने होईल. ब्रिक्स विभागात २१ चित्रपट दाखवले जातील. महोत्सवात नाना पाटेकर, के भाग्यराज, भारती राजा यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. महोत्सवात १४ मास्टर क्लास घेण्यात येणार आहेत. यामध्ये फरहान अख्तर, मधुर भांडारकर व कलाकार मार्गदर्शन करतील. यंदा स्पर्धा विभागातील पारितोषिकांची रक्कम वाढवण्यात आली आहे. राज्यात पणजी, पर्वरी, मडगाव व फोंडा येथे १३ ठिकाणी होणार चित्रपटांचे प्रदर्शन होईल. तसेच ओपन एअर स्क्रिनिंगचे देखील आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या इफ्फीचे उद्घाटन सोहळा श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे होईल. गत वर्षीप्रमाणे यंदाही चित्रपट मिरवणुकीचे आयोजन करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

इतर भाषेत चित्रपट निर्मिती करणाऱ्यांना मदत

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्य सरकार स्थानिक चित्रपट निर्मात्यांना मदत करत आहे. यंदाच्या इफ्फीअमध्ये देखील गोमंतकीय चित्रपट निर्मात्यांसाठी विशेष विभाग असेल. अन्य भाषेत चित्रपट निर्मिती करणाऱ्या गोमंतकीयांना देखील मदत देण्याचा विचार आम्ही करत आहोत. भविष्यात गोव्यात पीपीपी तत्वावर फिल्म सिटी बांधण्याचा विचार सुरू आहे.

हेही वाचा
सर्व पहा