वास्को : ‘संडे मार्केट’ला (Sunday Market Vasco) लागलेल्या भीषण आगीनंतर प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आगीमुळे प्रभावित झालेल्या १४५ दुकानदार आणि फेरीवाल्यांचे महसूल खात्याच्या जमिनीवर स्थलांतर करण्यात येणार आहे. वास्कोतील सर्व बाजारपेठांची सोमवारी व्यापक अग्निसुरक्षा तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुरगाव नगरपालिकेत आज झालेल्या संयुक्त बैठकीत वरील निर्णय घेण्यात आले. वास्कोचे आमदार कृष्णा उर्फ दाजी साळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला मुरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी मधू नार्वेकर, उपजिल्हाधिकारी प्रताप गावकर, मामलेदार, अग्निशमन दलाचे अधिकारी तसेच बाजारातील विक्रेते उपस्थित होते.
आगीमुळे बाधित झालेल्या दुकानदार आणि फेरीवाल्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून त्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करता यावा, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. त्यासाठी महसूल खात्याच्या जागेची निश्चिती करण्यात आली आहे.
बाजारपेठांची होणार अग्निसुरक्षा तपासणी
सोमवारी वास्कोतील सर्व बाजारपेठांची सखोल तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत अग्निसुरक्षेच्या उपलब्ध सुविधा, अग्निशमन हायड्रंटची उभारणी, आग प्रतिबंधक उपाययोजना आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची तयारी यांचा आढावा घेतला जाणार आहे.
याशिवाय, वास्कोतील जीर्ण आणि धोकादायक इमारतींनाही प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात येणार आहेत. संबंधित इमारतींच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे.
‘संडे मार्केट’मधील आगीच्या घटनेने बाजारपेठांमधील अग्निसुरक्षा आणि जुन्या इमारतींच्या स्थितीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी कितपत प्रभावीपणे होते, याकडे आता दुकानदार आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.


