परंपरा अनंत काळाची, पण ‘जीवन’ तात्पुरते ?

Story: राज्यरंग- महाराष्ट्र |
12th November, 11:54 pm
परंपरा अनंत काळाची, पण ‘जीवन’ तात्पुरते ?

न्यायालयांनी कितीही कठोर आदेश दिले, तरी ते प्रत्यक्षात कधीच पाळले जात नाहीत. हे वास्तव स्वीकारत न्यायपालिका आपल्या आदेशांकडे पूर्ण तटस्थपणे पाहते. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्याचे आदेश निघतात, पण विसर्जन होताना नियमांची पायमल्ली उघडपणे होते. दिवाळीत फटाक्यांवर बंदी लादली जाते, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी नागरिकांना कानात बोटे घालण्याची वेळ येते. आदेश देणे हे न्यायपालिकेचे कर्तव्य आहे, पण त्याची अंमलबजावणी होत आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी मग कोणाची?

राजेशाही काळातील तोफा आणि आतिषबाजीची परंपरा आजच्या लोकशाहीतही जशीच्या तशी टिकवून ठेवण्याचा चंग नागरिकांनी बांधला आहे. वाढदिवस असो वा अन्य कोणताही आनंदोत्सव, डीजेचा दणदणगाट आणि फटाक्यांची आतषबाजी झाल्याशिवाय तो पूर्ण मानला जात नाही. काळ बदलला, रात्रीचा अंधार दूर करण्यासाठी प्रकाशाचे स्त्रोत उपलब्ध झाले, तरीही जुन्या परंपरांच्या नावाखाली आकाशात रॉकेट आणि दिवे सोडण्याचा अट्टाहास काही सुटत नाही. 

मुंबईसारख्या महानगरांमध्ये आज शंभर-शंभर मजली इमारती उभ्या राहत असताना, गल्लीबोळात उडवले जाणारे हे रॉकेट थेट इमारतींना पेटवून देतात, अग्निशमन दलाच्या गाड्यांना रस्ता मिळत नाही आणि त्यामुळे मोठे अपघात घडतात. मुंबई अग्निशमन दलाच्या नोंदीनुसार, दिवाळीच्या काही दिवसात शहरात तब्बल ८९ हून अधिक आगीच्या घटना घडल्या. त्यापैकी जवळपास २८ हून अधिक घटना थेट रॉकेट आणि आकाशात उडणाऱ्या फटक्यांमुळे घडल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असूनही आपली परंपरा खंडित होणार नाही, असाच पवित्रा सर्वसामान्य जनता घेते.

दुसरीकडे, या प्रदूषणावर चिंता व्यक्त करणाऱ्या शास्त्रज्ञांना आणि पर्यावरणप्रेमींना राजकीय नेत्यांकडून प्रत्युत्तर दिले जाते. फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा बाऊ करू नका, असे सल्ले देऊन प्रदूषण तात्पुरते असते, पण परंपरा अनंत काळाची असते, असा युक्तिवाद केला जातो. फुफ्फुसे निकामी झाली किंवा प्राण गेले तरी चालतील, पण परंपरा जपली गेली पाहिजे, अशी ही विचारसरणी मानवी जीवनापेक्षा परंपरेला किती प्राधान्य देते, हे स्पष्ट करते.

केवळ आदेश देऊन मूकदर्शक बनणारी न्यायपालिका आणि परंपरा जपण्याचा अट्टाहास धरणाऱ्या जनतेची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत विकासाच्या आणि प्रगतीच्या गोष्टी केवळ कागदावरच राहतील. पर्यावरण आणि आरोग्याचा बळी देऊन साजरी केली जाणारी ही परंपरा मानवी अस्तित्वासाठीच घातक ठरू शकते, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आता आली आहे.