एखादी घटना घडली की नेहमी सरकार आणि पोलिसांना दोष दिला जातो. आमची जबाबदारी काय, त्यावर कधी चर्चा होत नाही. समाज म्हणून आम्ही सगळेच संवेदना हरवून बसलो आहोत का, त्यावर चर्चा होत नाही. होणारी घटना रोखणे शक्य असते, तरीही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. घटना घडल्यानंतर, ती घडण्यापूर्वीच आपल्याला कल्पना आली होती किंवा आपण ते होत असल्याचे पाहिल्याचे कॅमेऱ्यासमोर येऊन सांगतो. ती रोखण्यासाठी आपण काहीच करत नसतो. म्हणून तर रोज कितीतरी लोक अत्याचाराला बळी पडतात. समाज रोखत नाही म्हणून कोणीही नराधम उठतो आणि भर रस्त्यात, कार्यालयात, बसमध्ये कुठेही एखाद्या कमनशिबी युवतीवर कोयत्याने, सुऱ्याने वार करून तिला ठार करतो. समाज पाहत असतो उघड्या डोळ्याने. सगळ्या संवेदना गोठवून समाजाचे हात व्हिडिओ काढत असतात, मोबाईलच्या डोळ्यांनी. सारे घडल्यावर आपण सरकार आणि पोलिसांच्या नावाने ओरडायला मोकळे होतो.
म्हापशात दिवाळीच्या आदल्या रात्री फुगे विकणाऱ्या कुटुंबातील एका चार वर्षीय चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराला कुठे ना कुठे समाजाचे दुर्लक्ष जबाबदार आहे. ज्या अज्ञात नराधमाने त्या मुलीला नेले, त्याला कोणीच रोखू शकला नाही. तिला नेताना आपण पाहिले असे सांगणारे आज लोक दिसतात. मान्य आहे, तो नेणारा माणूस त्या फुगे विकणाऱ्या कुटुंबातीलच कोणीतरी वाटला असावा म्हणून त्याकडे दुर्लक्ष झाले असेलही, पण आपण जागरूक नागरिक म्हणून त्यावेळीच त्याला दमटावले असते, ती मुलगी तुझी कोण आहे, असा प्रश्न केला असता किंवा पोलिसांना कळवतो, असे म्हटले असते तरीही तो नराधम तिथून पळाला असता किंवा त्या दुर्दैवी चिमुरडीवर ही वेळ आली नसती. पोलिसांचा धाक राहिलेला नाही हेही तेवढेच सत्य आहे, मात्र समाजाचाही वाईट प्रवृत्तींवर धाक राहिलेला नाही. कुठलीही घटना होताना आपण बघे होतो. हिंमत गळून पडलेले मांसाचे पुतळे होतो. समाजाने सजगता दाखवली, तर बऱ्याच गोष्टी टळू शकतात. सर्वत्र हीच निराशेची स्थिती आहे. समाजाची निष्क्रियता अशी उघड होत आहे की, आपण आपल्यात डोकावण्याचे सोडून दुसऱ्याचे धिंदवडे काढण्यात मग्न असतो. अशा असंवेदनशीलतेमुळेच आज समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा आहे. म्हापशातील घटना घडलीच नसती जर, ज्यांनी त्या संशयिताला पाहिले त्यांनी वेळीच त्याला अडवले असते तर. म्हापसा शहरातील सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एवढ्या मोठ्या शहरात सीसीटीव्हीचेही साधे जाळे नाही. विकासाच्या नावाखाली राजकर्ते खरोखरच समाजाला सुरक्षा देत आहेत का, त्यावरही विचार करण्याची वेळ आली आहे.
म्हापसा शहर हे व्यापाराचे मोठे केंद्र असून, उत्तर गोव्याला जोडणारे महत्त्वाचे आणि केंद्रस्थानी असलेल्या या शहरात बाहेरील राज्यांतून येणाऱ्या बसेस थांबतात. रोज हजारो प्रवासी ये - जा करणाऱ्या या शहरात सुरक्षेच्या उपायांसाठी सीसीटीव्हीचे जाळे असणे ही गरज होती. मात्र तो प्रस्तावही मार्गी लागलेला नाही. त्यामुळेच आता घडलेल्या घटनेचे राजकारण करण्यासही बरेच लोक व्यस्त आहेत. फुगे विकून पोट भरणाऱ्या कुटुंबातील एका लहान निष्पाप मुलीवर आलेली परिस्थिती एका बाजूला आणि राजकारण करणारे एका बाजूला. घटना घडल्यानंतर मोर्चे, मेणबत्त्या घेऊन निषेध फेरी या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत, पण सुरक्षित समाज निर्माण करण्याचे आव्हान आम्ही स्वीकारायचे नाही का? एका लहान मुलीला एक माणूस नेतो, ती रडते आहे, पण त्यावेळी त्या व्यक्तीला अडवून जाब विचारण्यापेक्षा आपण ती घटना होऊ देतो, यात आता जी स्थिती निर्माण झाली आहे, त्याला जबाबदार कोण? समाज म्हणून आपण त्या गोष्टीला जबाबदार नाही का? प्रशासन, सरकार, पोलीस या साऱ्या गोष्टी सुरक्षित समाज निर्माण करण्यातले दुवे आहेत. ते अपयशी ठरतीलही, पण शेवटी समाजाने बधीर होऊन कसे चालेल? थोडी जबाबदारी आमचीही आहे. प्रत्येकाची आहे. ती जबाबदारी ओळखली, तर असा प्रकार करण्याचे धाडस कुठलाच नराधम करणार नाही. समाजाने काय करावे ते कोणी सांगायचीही गरज नाही. फक्त जबाबदारीची जाण असायला हवी.


