राजकारणात आणि तोही भाजपचा विचार केला, तर काही प्रश्नांची उत्तरे कधीच मिळत नाहीत. चार वर्षांपूर्वी आपल्या काँग्रेसमधील सहकाऱ्यांसह भाजपमध्ये दाखल झालेल्या मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांना तब्बल चार वर्षे मंत्रिपद न देता ताटकळत ठेवत, आता निवडणुकीला अवघे काही महिने बाकी असताना मंत्रिपद बहाल करून त्या पक्षाने नेमके काय साधले आहे, असा प्रश्न आता अनेकजण विचारत आहेत. पण त्याचे उत्तर मिळत नाही. ते उत्तर ना त्या पक्षाचे स्थानिक नेते देतात, ना केंद्रीय नेते. अर्थात संकल्प यांच्या समर्थकांना त्याची काळजी नाही कारण काही महिन्यांसाठी का असेना, संकल्प मंत्री झाले आहेत त्यावर ते समाधानी आहेत. आता त्यांना महत्त्वाची खाती मिळाली आहेत, हे मात्र तेवढेच खरे आहे. वास्तविक फोंड्याचे आमदार रवी नाईक यांच्या निधनापासून, म्हणजेच गेले वर्षभर मंत्रिमंडळातील एक मंत्रिपद रिक्त होते. त्या पदावर कोणाची वर्णी लागेल याबाबतची भाकिते सर्रास कानावर पडत होती, पण प्रत्यक्षात तसा समावेश केला गेला नाही. एवढेच नव्हे, तर फोंड्यातील पोटनिवडणुकीतून रवी नाईक यांचे पुत्र रीतेश यांना निवडून आणले जाणार व त्यांचा मंत्रिपदी समावेश होणार, अशी चर्चाही सुरू होती, पण प्रत्यक्षात जाहीर झालेली पोटनिवडणूक न्यायालयाने रद्द केल्यामुळे त्या वार्ताही फोल ठरल्या. आता पोटनिवडणुकीला नेमका विलंब का झाला, की लावला गेला, त्याचे उत्तरही कोणीच दिलेले नाही. खरे म्हणजे, जागा रिक्त झाल्यानंतर गोवा सरकार किंवा संबंधित यंत्रणेने लगोलग पावले उचलली असती, तर या पुढच्या घडामोडी टळल्याही असत्या. पण मंत्रिपदाप्रमाणेच पोटनिवडणुकीला विलंब का झाला, याचे उत्तरही गुलदस्त्यातच राहिले आहे.
रिक्त मंत्रिपदावर अनेकजण डोळा ठेवून होते व त्यात २०२२ मधील निवडणुकीनंतर काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आमदारांचा समावेश होता. यापूर्वी आलेक्स सिकेरा आणि नंतर दिगंबर कामत यांचा समावेश झाला होता, पण नंतर सिकेरा यांनी राजीनामा दिला होता. पण आता संकल्प यांचा समावेश झाल्याने पक्षांतर केलेले दोघे पुन्हा मंत्रिमंडळात समाविष्ट झाल्यासारखे झाले आहे. तसे पाहिले, तर मायकल लोबोंसारखी मंडळी मंत्रिपदी आरूढ होण्यास कधीपासून उत्सुक झालेली आहेत, पण भाजपच्या स्थानिक तसेच केंद्रीय नेत्यांनी संकल्प यांना कौल दिला व त्यामुळेच ऐन दिवाळीच्या आदल्या दिवशी त्यांना मंत्रिपदाची शपथ देवविली गेली. अर्थात यापूर्वी दोनदा त्यांना मंत्रिपदाची संधी होती, पण ऐनवेळी त्यांचे नाव मागे पडले होते. असे काय झाले व शेवटच्या क्षणी त्यांचे नाव मागे का पडले, त्याचे उत्तर मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते हिरमुसले होते. पण संकल्प यांच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या वाढदिवसाच्या वेळी स्वतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संकल्प यांना “भिवपाची गरज ना,” त्यांना चांगले दिवस येतील असे सांगितले होते व त्यामुळे संकल्प लवकरच मंत्री होतील, असे संकेत त्यांच्या कार्यकर्त्यांना मिळाले होते. त्यामुळे हेच ते ‘अच्छे दिन’ असे ते म्हणू लागले आहेत. तरीसुद्धा, राजकीय निरीक्षकांना मात्र मुरगाव तालुक्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची बाजू भक्कम करण्यासाठीच भाजपने ही व्यूहरचना केली असावी, असे वाटते. तालुक्यात मुरगाव, वास्को, दाभोळी व कुठ्ठाळी असे चार मतदारसंघ येतात. सध्या ते चारही मतदारसंघ जरी भाजपकडे असले, तरी हल्लीच केलेल्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणात स्थिती चांगली नसल्याचा अहवाल आल्यानंतर त्यावर उपाय म्हणून या तालुक्याचे मंत्रिमंडळातील प्रतिनिधीत्व वाढविण्याचा निर्णय उच्च पातळीवर झाला आणि त्याचा लाभ संकल्प यांना झाला, असे मानले जाते.
२०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी असाच काहीसा प्रयोग सासष्टीत करताना कुडचडेचे नीलेश काब्राल यांना मंत्रिमंडळातून वगळून त्या जागी नुवेचे आलेक्स सिकेरा यांना घेण्यात आले होते, पण त्या निवडणुकीत त्याचा काहीच लाभ झाला नव्हता व त्यामुळे मुरगाव तालुक्यातील भाजपची ही खेळी कितपत लाभदायक ठरेल, अशी विचारणा राजकीय वर्तुळातून आता होताना दिसत आहे. पण संकल्प हे हाडाचे कार्यकर्ते आहेत. त्यांची ही वृत्ती काँग्रेसमध्ये असतानाही दिसून आली होती. त्यावेळी त्यांनी तत्कालीन भाजपचे मंत्री मिलिंद नाईक यांना विविध प्रकरणे उपस्थित करून कसे हैराण केले होते, त्याच्या आठवणी अजून लोकांच्या मनात ताज्या आहेत. नंतर म्हणजे भाजपमध्ये दाखल झाल्यावर त्यांनी आपली निष्ठा जरी बदललेली असली, तरी लोकांची कामे करण्याची, त्याच्या मदतीला धाऊन जाण्याची व त्यासाठी प्रसंगी सत्ताधाऱ्यांना शिंगावर घेण्याची वृत्ती कायम ठेवली होती, हे अनेकदा दिसून आलेले आहे. पण आता मंत्रिपदाची झुल अंगावर धारण केल्यामुळे त्यांच्या अंगातील या धडपडी वृत्तीसमोर अनेक निर्बंध निश्चितच येतील, ते प्रसंग ते कसे हाताळतात, ते पाहावे लागेल. पण खरा प्रश्न राहणार आहे, तो मुरगावबरोबरच अन्य तीन मतदारसंघांत (दाभोळी, वास्को व कुठ्ठाळी) भाजपचा दबदबा कायम ठेवण्याचा. त्यापैकी दाभोळीत मॉविन गुदिन्हो यांना त्यांच्याच एका समर्थकाने आव्हान उभे केलेले आहे, तर कुठ्ठाळीत अपक्ष आमदार आहेत. ते भाजपमध्ये येणार असल्याच्या अफवा आहेत, पण खरेच ते भाजपमध्ये प्रवेश करण्याचे धैर्य दाखवतील काय व नसल्यास तेथे काय, हा प्रश्न आहेच. त्यामुळे मुरगाव तालुक्यातील चार मतदारसंघांचा किल्ला लढविण्याचे आव्हान तेथील दोन मंत्री मॉविन गुदिन्हो व संकल्प आमोणकर यांच्यासमोर राहणार आहे. भाजपने २०२७ साठी ३० मतदारसंघ जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे, तर मुख्यमंत्री पुन्हा ‘डबल इंजिन’ सरकारच्या घोषणा करत आहेत. त्या दृष्टीने भाजप एकेक पावले उचलत असून त्याकडे पाहता विरोधी पक्षांचे काहीच ठरताना दिसत नाही. भाजप विरोधात सगळे विरोधी पक्ष एकत्र येण्याची चिन्हेही दिसत नाहीत, त्यामुळे २०२७ मधील निवडणूक नेमकी कशी असू शकेल, त्याचेही भाकित करणे शक्य होत नाही. लोकांमध्ये असलेला प्रस्थापितांविरुध्दचा रोष कमी करण्यासाठी भाजप एकेक खेळी खेळत असून संकल्प यांचा झालेला मंत्रिमंडळातील समावेश हा त्याचाच एक भाग आहे. आता त्याचा नेमका किती लाभ होतो, ते निवडणुकीनंतरच दिसून येईल.



