याजसाठी केला होता अट्टाहास

संकल्प यांना मिळालेले मंत्रिपद आणि मिलिंद नाईक यांची सुरू झालेली बदनामी यावरून मुरगावचे राजकारण तापू लागल्याचे स्पष्ट दिसत आहे. संकल्प यांना हे मंत्रिपद आधीच मिळाले असते, तर ही निवडणूक त्यांना काहीशी सोपी झाली असती. विधानभेचा कार्यकाळ संपताना मिळालेले मंत्रिपद त्यांच्या किती कामी येते, ते पुढे पहावे लागेल.

Story: संपादकीय |
09th November, 11:58 pm
याजसाठी केला होता अट्टाहास

संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. जो भैरवीमध्ये गायिला जातो. 'याजसाठी केला होता अट्टाहास । शेवटचा दिस गोड व्हावा। ' अशा अर्थाचा हा अभंग. सप्टेंबर २०२२ मध्ये ज्या हेतूने संकल्प आमोणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्यांचा तो हेतू चार वर्षे साध्य झाला नव्हता. तब्बल चार वर्षे आमोणकरांना प्रतीक्षा करावी लागली. दरम्यानच्या काळात आलेक्स सिक्वेरा यांना आधी म्हणजे २०२३ मध्ये मंत्रिपद दिले. त्यानंतर २०२५ मध्ये त्यांनी राजीनामा दिल्यानंतर दिगंबर कामत यांची मंत्रिपदी वर्णी लागली. यादरम्यान गोविंद गावडे यांना हटवून रमेश तवडकर यांना मंत्रिपद दिले गेले; पण संकल्प आमोणकर यांना संधी मिळेना. पक्षांतर करताना ज्या गोष्टी भाजपसमोर काँग्रेस नेत्यांनी ठेवल्या होत्या, त्यात आपल्याला मंत्रिपद मिळावे, ही आमोणकर यांची मुख्य इच्छा होती. भाजपने त्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, कारण मंत्रिमंडळातील बहुतेकजण हे वजनदार नेते होते. अनेक मंत्र्यांबाबत वाद झाले, पण त्यांना हटवण्याचे धाडस भाजपने दाखवले नाही. रवी नाईक यांच्या निधनानंतर रिक्त झालेली जागा त्यांच्या कुटुंबातील सदस्यालाही दिली गेली नाही. गेले वर्षभर ती एक जागा रिकामी होती. आता निवडणूक जाहीर व्हायला अवघे दोन महिने राहिले आहेत. तिसऱ्या महिन्यात निवडणूक आणि चौथ्या महिन्यात निकाल येईल. त्यामुळे मंत्री म्हणून फक्त नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोनच महिने मिळू शकतील आणि संकल्प आमोणकर यांना केवळ एवढ्याच काळात कारभार पाहता येईल. जानेवारीत निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली, तर मंत्रिपद असूनही काही काम करता येणार नाही. म्हणजेच संकल्प हे मंत्री असतील, पण त्या काळात त्यांचे अधिकार मर्यादित राहतील. कृषी, नागरी पुरवठा, हस्तकला आणि वस्त्रोद्योग ही खाती दिल्यामुळे त्यांच्या कामावरही आताच मर्यादा आल्या आहेत. यंदा पाऊस कमी झाल्यामुळे कृषी क्षेत्रासाठी कमी वेळातही काम करण्याला खूप वाव आहे. संकल्प आमोणकर हे पूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष होते. यावेळी थेट कृषी खातेच त्यांच्याकडे आल्यामुळे दोन्ही ठिकाणी काम करण्याची संधी आहे. मात्र त्यासाठी पुरेसा कालावधी नाही. हस्तकला आणि नागरी पुरवठा ही खातीही महत्त्वाची आहेत. जास्त वेळ उपलब्ध नसल्यामुळे दोन महिन्यांत जे शक्य आहे, ते करण्यासाठी आमोणकर यांना प्रयत्न करावे लागतील. एवढ्या उशिरा मंत्रिपद मिळाल्यामुळे, याचसाठी पक्षांतर केले होते का, असा प्रश्न उपस्थित होतो.

आमोणकर हे सुरुवातीपासून काँग्रेसचे कार्यकर्ते. काँग्रेसच्या युवा फळीतून पुढे आलेले आमदार. निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना मुरगावमध्ये पुन्हा जिंकण्यासाठी हे मंत्रिपद किती कामी येते, ते निवडणुकीत कळेल. तिथे पूर्वीचे मंत्री आणि भाजपचे नेते मिलिंद नाईक काय भूमिका घेतात, त्याकडे सर्वांचे लक्ष आहे. एका बाजूला संकल्प आमोणकर हे मंत्री झाले आहेत, तर दुसऱ्या बाजूला मिलिंद नाईक यांची बदनामी सुरू झाली आहे. नाईक यांना २०२२ मध्येही अशाच प्रकारे बदनामीला सामोरे जावे लागले होते आणि त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आता २०२७ ची निवडणूक जवळ आली असताना पुन्हा आपली बदनामी केली जात असल्याची तक्रार त्यांनी दाखल केली आहे. संकल्प यांना मिळालेले मंत्रिपद आणि मिलिंद नाईक यांची सुरू झालेली बदनामी यावरून मुरगावचे राजकारण तापू लागल्याचे स्पष्ट दिसत आहे. संकल्प यांना हे मंत्रिपद आधीच मिळाले असते, तर ही निवडणूक त्यांना काहीशी सोपी झाली असती. विधानसभेचा कार्यकाळ संपताना मिळालेले मंत्रिपद त्यांच्या किती कामी येते, ते पुढे पहावे लागेल. आमोणकर यांनी मोठ्या चिकाटीने राजकारणात आपले पाय रोवण्यासाठी प्रयत्न केले. एका निवडणुकीत अवघ्या काही मतांनी त्यांचा पराभव झाला होता; पण शेवटी २०२२ मध्ये त्यांना संधी मिळाली. मिलिंद नाईक यांना एक प्रकरण अंगलट आल्यामुळे आमोणकर यांचा मार्ग अधिक सुकर झाला होता. त्यानंतर बरेच पाणी जुवारीतून वाहून गेले आहे. मिलिंद नाईक पुन्हा तिथे आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत असतानाच त्यांची बदनामी पुन्हा सुरू झाली आहे. राजकारणातील हेच प्रकार मुरगावमधली लढत अत्यंत रंगतदार करणार, हे निश्चित!