महसूल खात्याअंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या सुमारे २० प्रकारच्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने ‘कॉमन केडर’ तयार केले आहे. तिन्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेत वेगवेगळ्या प्रकारच्या गटांतील कर्मचाऱ्यांची भरती केली जाते. म्हणजे यापूर्वी कुशावती वगळला, तर उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये आपल्याला आवश्यकता असलेल्या नोकरीच्या पदांवरील कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. सध्या जसा ‘गोवा कर्मचारी भरती आयोग’ आहे तसा पूर्वी आयोग नव्हता, त्यामुळे जिल्हाधिकारीच खाते प्रमुख या नात्याने पदांची भरती करायचे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारातील कार्यालयांमध्ये तसेच भूमी अभिलेख कार्यालयात सुमारे २० गटांतील एक हजारपेक्षा जास्त कर्मचारी आहेत. या ‘कॉमन केडर’चा आग्रह काही नेत्यांनीच धरल्यामुळे केडर तयार करण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. म्हणजे ज्या नेत्यांनी आपल्या परिसरात कर्मचाऱ्यांची भरती केली आहे आणि जे दक्षिण गोव्यातील कानाकोपऱ्यात सेवा देत आहेत, त्यांना उत्तर गोव्यात आपल्या घराच्या तालुक्यात आणण्यासाठीही या केडरचा फायदा काहीजण करून घेणार आहेत. पुढील काही दिवसांत ज्या बदल्या होतील, त्यावरून या केडरची घाई का आहे, ते लक्षात येईल.
‘कॉमन केडर’ करणे याचा फायदा असा की सारे कर्मचारी एकाच यादीत येतील. कुठेही कोणालाही बदलीवर पाठवता येईल. चांगला कर्मचारी एखाद्या भागात पाठवायचा असेल, तर तेही करता येईल. त्याचे सर्व अधिकार आयएएस अधिकारी असलेल्या व्यक्तीकडे राहतील, अशी चर्चा आहे. म्हणजे जिल्हाधिकारी आपल्या भागातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करू शकतील की नाही, ते नियम तयार झाल्यानंतर स्पष्ट होईल. तिन्ही जिल्हाधिकाऱ्यांचे कर्मचारी एकाच केडरमध्ये येतील, त्यामुळे त्यांच्या नियुक्ती, बदल्यांपासून कारवाईपर्यंतचे अधिकारी खातेप्रमुख म्हणून एकच व्यक्ती असेल की जिल्हाधिकाऱ्यांनाही काही अधिकार असतील, ते सरकारने स्पष्ट करायला हवे. आपल्या परिसरातील एखादा कर्मचारी गैरप्रकार करतो किंवा बेशिस्त वागत असेल, तर अशा कर्मचाऱ्याला वठणीवर आणण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असायला हवेत. त्यासाठी पर्वरीत सचिवालयात बसलेल्या अधिकाऱ्यांपर्यंत फाईल पाठवायचे दिवस आले, तर एका अर्थाने या साऱ्या केडरला काही अर्थ राहणार नाही.
सध्या एका जिल्ह्यातील कर्मचारी दुसऱ्या जिल्ह्यात पाठवता येत नाही. ‘कॉमन केडर’ झाल्यामुळे तिन्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयांतील कर्मचारी राज्यात कुठेही जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयांत बदलीवर पाठवता येतील आणि नियुक्त करता येतील. यात काही कर्मचाऱ्यांचे फायदे आहेत आणि काहींचे तोटेही आहेत. फायदे अशासाठी की एखादा दक्षिण गोव्यातील कर्मचारी जर उत्तर गोव्यात भरती झालेला आहे, तर तो आता आपल्या जिल्ह्यात जाऊ शकतो. काणकोणचा कर्मचारी जर दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या किंवा उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेत भरती झालेला आहे, तर तो आता काणकोणला बदली मागू शकतो. तोटे असे की एखाद्या राजकीय नेत्याला एखाद्या कर्मचाऱ्याला शिक्षा करायची आहे, तर त्याला काणकोणमधून पेडण्यातही पाठवले जाऊ शकते. ज्या कर्मचाऱ्यांचा ‘कॉमन केडर’मध्ये समावेश होणार आहे, त्यात अव्वल कारकून आणि तलाठीसारख्या महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. एकेपासून एमटीएसपर्यंत सारेच ‘क’ श्रेणीतील कर्मचारी यात येतात.
काही तोटे असे आहेत की, ज्येष्ठता यादी तयार करताना, एकाच महिन्यात वेगवेगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयांत वेगवेगळ्या तारखांना रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या ज्येष्ठतेवर परिणाम होऊ शकतो. म्हणजेच, एखादा कर्मचारी उत्तर गोव्यात आता बढती मिळून वरच्या पदावर येणार होता, तो ‘कॉमन केडर’मध्ये मागे जाऊ शकतो. ज्या कर्मचाऱ्याला इतक्यात बढती मिळायची शक्यता नव्हती, तो कर्मचारी आता ज्येष्ठता यादीत सर्वात वरच्या स्थानी येऊ शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये या साऱ्या गोष्टींमुळे चलबिचल आहे. ‘कॉमन केडर’ हा सर्व प्रशासकीय कामांसाठी चांगला उपाय असला तरी अनेक कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार आहे. अनेकजण एकाच कार्यालयात वर्षानुवर्षे खिळून आहेत, ते या ‘कॉमन केडर’मुळे सहजासहजी दुसऱ्या ठिकाणी जातीलच असे नाही. काही कर्मचारी आपल्या तालुक्याच्या ठिकाणी बदली करून घेतील, अनेकजण ज्येष्ठता यादीत वरच्या स्थानांवर येऊन बढती घेऊन पुढे जातील, पण त्याचबरोबर कुठेही बदलीवर जाण्याचा आणि बढती हुकण्याचा धोकाही काहीजणांना आहे. ‘कॉमन केडर’ लागू करताना सरकारने या सर्व गोष्टींवर गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.


