गोव्याला निघालेल्या 'फ्लाई-९१'च्या फ्लाईटमध्ये प्रवाशाला झाली वीर चक्र विजेत्याची भेट; अश्रूंचा बांध फुटला

हैदराबादहून गोव्याकडे जाणाऱ्या विमानातील पायलट वीर चक्र विजेते विंग कमांडर अभिनंदन वर्थमान असल्याचे समजताच एका प्रवाशाला आनंदाश्रू अनावर झाले. अभिनंदन यांनी अत्यंत नम्रपणे त्याला मिठी मारली. हा अनुभव त्यांच्यासोबत आयुष्यभर राहील असे म्हणत सदर प्रवाशाने एकंदरीत घटना सोशल मिडियावर शेअर केली.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
7 hours ago
गोव्याला निघालेल्या 'फ्लाई-९१'च्या फ्लाईटमध्ये प्रवाशाला झाली वीर चक्र विजेत्याची भेट; अश्रूंचा बांध फुटला

पणजी : आयुष्यात काही क्षण असे येतात, जे शब्दांत मांडणे अशक्य असते. अंगावर रोमांच आणणारा आणि मनाला हेलावून टाकणारा असाच एक थरारक अनुभव नुकताच एका सामान्य प्रवाशाला आला, जेव्हा त्याचा नेहमीचा विमान प्रवास आयुष्यभराची सर्वात अमूल्य आठवण बनून राहिला. हैदराबादहून गोव्याच्या दिशेने झेपावलेल्या 'फ्लाय ९१' च्या एका विमानात घडलेला हा भावनिक प्रसंग सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.




रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संबंधित प्रवाशाने आपला अनुभव शेअर केला. तो आपल्या पत्नीसह हैदराबादहून गोव्याला चालला होता. विमानातील वातावरण नेहमीप्रमाणे अगदी सामान्य होते. सर्व प्रवासी झोपेत असताना विमान रात्रीच्या सुमारास गोव्याच्या विमानतळावर सुखरूप उतरले. विमान जमिनीवर स्थिरावल्यानंतर फ्लाईट अटेंडंटने नेहमीप्रमाणे प्रवाशांचे आभार मानण्याची घोषणा सुरू केली. मात्र, मायक्रोफोनवर जेव्हा विमानाचे कॅप्टन म्हणून 'वीर चक्र विजेते विंग कमांडर अभिनन्दन वर्थमान' यांचे नाव पुकारले गेले, तेव्हा त्या प्रवाशाच्या पायाखालची जमीनच सरकली!


IAF Hero Abhinandan Varthaman Joins Regional Airline FLY91: Rediff Moneynews


२०१९ मधील बालाकोट हल्ल्यानंतर भारताच्या शौर्याचे आणि धैर्याचे एक जिवंत प्रतीक बनलेले विंग कमांडर अभिनंदन हे आपल्या विमानाचे पायलट आहेत, हे सत्य स्वीकारणे त्या प्रवाशासाठी क्षणभर अविश्वसनीय ठरले. कॉकपिटपासून अवघ्या तिसऱ्या ओळीत बसलेल्या या प्रवाशाचा ऊर अभिमानाने भरून आला. त्याने आपल्या पत्नीमार्फत विमानातील कर्मचाऱ्यांकडे एक नम्र विनंती केली की, सर्व प्रवासी खाली उतरल्यानंतर त्याला एकदा कॅप्टन अभिनन्दन यांची भेट घ्यायची आहे. विमान कर्मचाऱ्यांनीही याला संमती दर्शवली आणि विमानतळाच्या धावपट्टीवर ती ऐतिहासिक भेट प्रत्यक्षात आली.


Abhinandan Varthaman, The MiG-21 Pilot Who Became A National Hero, Has  Joined FLY91. The Move Comes As The Regional Airline Bets On Scale -  Inventiva


जेव्हा तो प्रवासी आणि त्याची पत्नी अभिनन्दन वर्थमान यांच्यासमोर उभे ठाकले, तेव्हा त्यांच्या भावनांचा बांध फुटला. देशाच्या या खऱ्या हिरोला आपल्यासमोर पाहताच त्या प्रवाशाचे डोळे पाणावले, त्याचे पाय अडखळले आणि तो स्वतःवर ताबा ठेवू शकला नाही. त्याला अनावर अश्रू दाटून आले आणि तो पूर्णपणे भावूक झाला.




एका सामान्य नागरिकाच्या डोळ्यात आपल्याबद्दल असलेला हा निखळ आदर आणि देशप्रेम पाहून विंग कमांडर अभिनन्दन यांनी जे केले, त्याने उपस्थितांची मने जिंकली. कसलाही गर्व किंवा बडेजाव न दाखवता, अत्यंत नम्रपणे त्यांनी आपली हातातली केबिन बॅग खाली ठेवली, त्या प्रवाशाच्या खांद्यावर हात ठेवून त्याला आधाराने उभे केले आणि अत्यंत आपुलकीने मिठी मारली. तिथे कोणतीही मोठी भाषणे किंवा दिखावा नव्हता, तर केवळ एका भारतीय सैनिकाची सामान्यांप्रती असलेली मानवता आणि जिव्हाळा त्या एका मिठीतून जाणवत होता. त्यानंतर विमानतळाच्या बसमध्ये आणि नंतर आत लाऊंजमध्येही त्यांच्यात काही वेळ मनमोकळा संवाद झाला.   



सोशल मीडियावर तरुणाईमध्ये या प्रसंगाची जोरदार चर्चा सुरू असून, 'खरे हिरो केवळ त्यांच्या धाडसामुळेच नव्हे, तर त्यांच्या उत्तुंग मानवतेमुळे महान ठरतात,' याची अनुभूती या घटनेने पुन्हा एकदा दिली आहे. भारतीय लष्कराच्या प्रत्येक योद्ध्याप्रती असलेली कृतज्ञता या प्रसंगाने पुन्हा एकदा देशवासीयांच्या मनात नवी ऊर्जा देऊन गेली.