मडगाव : दिल्लीहून रेल्वेने मडगावात (Delhi to Margao, Goa) आणण्यात आलेला सुमारे २.१ टन संशयास्पद चिकनचा साठा आज शुक्रवारी मडगाव रेल्वे स्थानकावर जप्त करण्यात आला. गोवा पोल्ट्री फार्मर्स अँड ट्रेडर्स असोसिएशन आणि ऑल पोल्ट्री असोसिएशनच्या (Goa Poultry Farmers and Traders Association and All Poultry Association) सदस्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. हा साठा २४ खोक्यांमधून वाहून आणण्यात आला होता.
रेल्वेतून आणण्यात आलेले हे चिकन खाण्यास अयोग्य असून ते आरोग्यासाठी धोकादायक असल्याचा संशय पोल्ट्री व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. दिल्ली ते मडगाव हा सुमारे ३६ तासांचा प्रवास करताना चिकन साठवण्यासाठी आवश्यक असलेली कोल्ड चेन राखण्यात आली नसल्याचा आरोप असोसिएशनचे अध्यक्ष प्रिस्को सिक्वेरा यांनी केला.
दीर्घ प्रवासादरम्यान योग्य तापमान राखले नसल्याने चिकन खराब होण्याची शक्यता आहे. त्याच्या सेवनामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. परराज्यांतून अशाप्रकारे निकृष्ट दर्जाचे आणि आरोग्यास अपायकारक चिकन गोव्यात आणण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी दोन्ही पोल्ट्री संघटनांनी केली आहे.


