पेडणे : गोव्यात मुदतीपेक्षा अधिक काळ बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांविरोधात विदेशी नागरिक नोंदणी कार्यालयाने (FRO) कारवाईचा बडगा उगारला आहे. केरी-पेडणे येथे राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत रशिया आणि युक्रेनमधील एकूण पाच नागरिक व्हिसाची वैध मुदत संपल्यानंतरही भारतात वास्तव्यास असल्याचे उघड झाले.
या मोहिमेत रशियाचे दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता. त्यांच्याकडे वैध पासपोर्ट आणि व्हिसा नसल्याचे तपासणीत आढळले. यातील एका रशियन पुरुषाने आपल्याकडे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त कार्यालयाचे (UNHRC) कार्ड असल्याचा दावा केला. मात्र, अशा कार्डाला भारतात अधिकृत मान्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
याशिवाय, युक्रेनमधील एक पुरुष आणि एका महिलाही वैध व्हिसाशिवाय भारतात मुदतीपेक्षा अधिक काळ वास्तव्यास असल्याचे आढळले. या सर्व परदेशी नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यांना देशातून हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
कारवाई सुरूच राहणार
गोव्यात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी अशा विशेष तपासणी मोहिमा यापुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे एफआरवोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे व्हिसाची मुदत संपल्यानंतरही गोव्यात मुक्काम करणाऱ्या परदेशी नागरिकांचे धाबे दणाणले आहेत.


