गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : कला अकादमी गोवातर्फे आयोजित ५१ व्या कोंकणी नाट्यस्पर्धा २०२६-२७ चा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेत भांगराळे गोंय अस्मिताय, मडगाव या संस्थेच्या ‘ला मिराज’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावत तीन लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले. नटरंग क्रिएशन्स, नावेली-डिचोली यांच्या ‘फेरल’ या नाटकाला द्वितीय क्रमांक आणि एक लाख ७५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले. युवा एकवट, भोमा-फोंडा यांच्या ‘अर्दकुटें कवन’ या नाटकाने तृतीय क्रमांक पटकावत १ लाख ५० हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले.
स्पर्धेतील उत्तेजनार्थ पारितोषिकांमध्ये जनशक्ती वेव्हलकेअर असोसिएशन, केळबाय-कुर्टी-फोंडा यांच्या ‘प्रेमजागोर’ आणि श्री सातेरी ब्राह्मणी संस्था, माळोली-सत्तरी यांच्या ‘रूप-अरूप’ या नाटकांचा समावेश आहे. या दोन्ही नाटकांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे.
दिग्दर्शन विभागात ‘ला मिराज’साठी डॉ. पूर्णानंद च्यारी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. त्यांना १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. ‘फेरल’साठी नितीन शिवराम नाईक यांनी द्वितीय क्रमांक (७ हजार रुपये), तर ‘अर्दकुटें कवन’साठी वैभव गोविंद काकोडकर यांनी तृतीय क्रमांक (५ हजार रुपये) मिळवला.
वैयक्तिक अभिनय पुरस्कारांच्या पुरुष गटात ‘ला मिराज’मधील अभिनयासाठी केदार संतोष सावंत यांनी प्रथम क्रमांक मिळवला. त्यांना सात हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. ‘दत्तराज-रूप-अरूप’मधील अभिनयासाठी गजानन झर्मेकर यांनी द्वितीय क्रमांक आणि पाच हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले.
महिला अभिनय गटात ‘ला मिराज’मधील अभिनयासाठी मानसी अवधूत केरकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना सात हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. ‘फेरल’मधील अभिनयासाठी वैभवी नाईक यांनी द्वितीय क्रमांक आणि पाच हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले.
पुरुष गटातील अभिनयासाठी शिरीष कळंगुटकर, सलील नाईक, सौरभ कारखानीस, मेघराज आकारकर, संगम चोडणकर, ओंकार गावडे, गोपाळकृष्ण केरकर आणि तिरतेश शैलेश चंद्रगडकर यांना प्रमाणपत्रे जाहीर झाली आहेत. महिला गटात रंजिता गावडे, रेश्मा संदीप नाईक, अर्पिता गावस, वेदा देसाई, आरती माटणेकर, तस्लीमा मयेकर, साची जल्मी आणि बालकलाकार स्वरा गावडे यांना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.
तांत्रिक विभागातील पारितोषिकांमध्ये रंगमंच मांडणीसाठी १५ हजार रुपयांचे पारितोषिक देवराज माजिक यांना जाहीर झाले असून आदर्श गोवेकर यांना प्रमाणपत्र मिळाले आहे. वेशभूषेसाठी पाच हजार रुपयांचे पारितोषिक ऐश्वर्या कुर्पसकर यांना, तर गौरी गावकर यांना प्रमाणपत्र जाहीर झाले आहे. प्रकाश योजनेसाठी पाच हजार रुपयांचे पारितोषिक साहिल बांदोडकर यांना, तर प्रमाणपत्र उमेश कार्बोटकर यांना मिळाले. रंगभूषेसाठी पाच हजार रुपयांचे पारितोषिक सारंग मळेकर यांना आणि प्रमाणपत्र एकनाथ नाईक यांना जाहीर झाले आहे. पार्श्वसंगीतासाठी पाच हजार रुपयांचे पारितोषिक प्रथमेश उसपकर यांना, तर प्रमाणपत्र प्रीतेश कुर्टीकर यांना देण्यात येणार आहे.
लेखन विभागात खास सत्तरी भागातील बोलीतील नवीन संहितेसाठी युगांक नायक यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना १० हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. वैभव कळंगुटकर यांनी द्वितीय क्रमांक मिळवत सात हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. तसेच, अनुवादित अथवा रूपांतरित संहितांसाठी आयोजित विशेष स्पर्धेत वैभव गोविंद काकोडकर यांनी १० हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्रीधर कामत बांबोळकर, निलेश म्हाळे आणि चतुरा विश्वास रायकर यांनी काम पाहिले. ६ नोव्हेंबर २०२६ रोजी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.


