मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर फेरफार : यशोमती ठाकूर

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी; मतदार यादीत बेकायदेशीरपणे नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे आणि दुबार नोंदणी करून मोठ्या प्रमाणावर फेरफार केला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या निरीक्षक व महाराष्ट्राच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
6 hours ago
मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर फेरफार : यशोमती ठाकूर

पणजी : मतदार यादीत बेकायदेशीरपणे नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे आणि दुबार नोंदणी करून मोठ्या प्रमाणावर फेरफार केला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या निरीक्षक व महाराष्ट्राच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे.  मतदारांच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या या प्रकाराची निवडणूक आयोगाने (Election commission of India) संपूर्ण जबाबदारी घ्यावी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना यशोमती ठाकूर यांनी निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर तीव्र प्रश्न उपस्थित केले. निवडणूक आयोगाच्या निवड समितीतून सरन्यायाधीशांना वगळून त्यांच्या जागी केंद्रीय मंत्र्याचा समावेश केल्यामुळे आयोगाची स्वायत्तता धोक्यात आली आहे. सध्याचा निवडणूक आयोग हा पूर्णपणे सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करत आहे, असा थेट आरोप त्यांनी केला.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा उल्लेख करत त्या म्हणाल्या, गेल्या पाच वर्षांत राज्यात ३२ लाख मतदार वाढले होते. मात्र, लोकसभा ते विधानसभा निवडणुकीदरम्यानच्या अवघ्या सहा महिन्यांच्या काळात तब्बल ३९ लाख नवीन मतदारांची भर पडली आहे. ही अतिरिक्त मतदार नोंदणी कुठे आणि कशी झाली, याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने जनतेला दिले पाहिजे.

राहुल गांधी यांनी महादेवपुरा, हरियाणा आणि अलंदा येथील मतदार याद्यांमधील दुबार नोंदणी, छायाचित्रांतील फेरफार आणि नावे वगळल्याचे प्रकार पुराव्यासह उघड केले आहेत, असे सांगून ठाकूर यांनी पश्चिम बंगालमध्ये ३९ लाख मतदारांना संशयास्पद ठरवून यादीतून वगळल्याचा मुद्दाही उपस्थित केला.

‘फॉर्म ६’ च्या गैरवापराचा आरोप

मतदार नोंदणी आणि नावे वगळण्याच्या प्रक्रियेत ‘फॉर्म ६’ चा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला गेला आहे. निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी या फॉर्ममधील बदलांवर १४ वेळा आक्षेप नोंदवले होते, परंतु त्या आक्षेपांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले, असा दावाही त्यांनी या वेळी केला.

मतदार जागृतीसाठी काँग्रेस पक्षाने गोव्यात ‘वोट बचाओ, देश बचाओ’ आंदोलन सुरू केले असून त्याअंतर्गत पदयात्रा काढण्यात आल्या आहेत. आता घरोघरी जाऊन मतदारांमध्ये जनजागृती केली जात आहे. येत्या काळात हे आंदोलन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि मतदान केंद्राच्या (बूथ) पातळीवर अधिक तीव्र केले जाईल, अशी माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली.

हेही वाचा
सर्व पहा