वझरे येथील शास्त्रीय संगीतसूर्य : रामकृष्णबुवा वझे

रामकृष्णबुवा वझे यांनी संगीतकार म्हणून आपल्या उत्तुंग प्रतिभेचे आणि कौशल्याचे रसिकांना दर्शन घडवले, त्यामुळे आजही त्यांच्या गाण्यांचे श्रवण ध्वनिमुद्रिकांद्वारे करण्याची जेव्हा रसिकांना संधी लाभते, तेव्हा त्यांना या शास्त्रीय संगीत सूर्याच्या कर्तृत्वाची प्रचिती येते.

Story: विचारचक्र |
03rd November, 11:39 pm
वझरे येथील शास्त्रीय संगीतसूर्य : रामकृष्णबुवा वझे

भारत आणि अन्यत्र भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील प्रतिभावंत गायक म्हणून नावाजलेले रामकृष्णबुवा वझे यांचा जन्म नोव्हेंबर १८७१ मध्ये दोडामार्गजवळच्या वझरे गावात झाला. मात्र, ते अवघे दहा महिन्यांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने, त्यांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागले. त्यांना स्थानिक शाळेत पाठवण्यात आले पण त्यांचे लक्ष तिथे लागले नव्हते, कारण लहानपणापासूनच त्यांना संगीताची खूप आवड होती. वडिलांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या आईला त्यांच्या शिक्षणासाठी खूप संघर्ष करावा लागला. ती आपल्या मुलासह शेवटी कागल संस्थानात गेली, जिथे त्यांनी प्रसिद्ध संगीतकार बळवंतराव पोहरे आणि विठोबा हडप यांच्याकडून गायनाचे शिक्षण घेतले. त्या काळी प्रचलित असलेल्या परंपरेनुसार, वयाच्या अगदी बाराव्या वर्षी त्यांच्यावर लग्न करण्याची आकस्मिकपणे पाळी आली. अकाली लग्न झाल्याने, त्यांच्यावर कुटुंबाच्या भरण-पोषणाची जबाबदारी आली आणि त्यामुळे  त्यांना उदरनिर्वाहासाठी मुंबईला गाठणे भाग पाडले. उदरनिर्वाहासाठी धडपडत असले तरी त्यांचे तन आणि मन संगीताच्या ध्यासापायी त्यांना वाराणसी, ग्वाल्हेर, इंदूर, उज्जैन आणि भारताच्या विविध भागात गायक तसेच संगीतकार म्हणून कौशल्य शिकण्यासाठी घेऊन गेले. वझेबुवा संगीतविद्या आत्मसात करण्यासाठी जिथे जिथे गेले, तिथे तिथे त्यांनी आपल्या साधनेद्वारे गायकीत प्राविण्य मिळवले. त्यांनी ग्वाल्हेर घराण्याच्या प्रख्यात संगीत क्षेत्रातील असामी बडे अली खाँ आणि निसार हुसेन खाँ यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे प्रशिक्षण घेतले. परंतु असे असले तरी कालांतराने आपल्या अथक साधनेद्वारे त्यांनी गायनाच्या विविध शैलींचे ज्ञान आणि कौशल्यदेखील आत्मसात केले, ज्यामुळे ते भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातले दिग्गज बनले. खरे तर त्यांनी ग्वाल्हेर घराण्याचे गायक म्हणून लौकिक मिळवला असला, तरी नंतर त्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण गायकीला लोकप्रिय करून स्वतःसाठी संगीत रसिकांच्या हृदयात आदराचे विशेष स्थान निर्माण केले. गायनाशिवाय त्यांनी व्हायोलिन आणि सतार ही वाद्ये वाजवण्यातही प्रावीण्य मिळवले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 'रणदुंदुभी' आणि 'संन्यस्त खड्ग' तसेच 'शहा शिवाजी', 'राक्षसी महत्त्वाकांक्षा' आणि इतर नाटकांच्या संगीत दिग्दर्शनाच्या क्षेत्रात त्यांना विलक्षण प्रतिष्ठा आणि लौकिक मिळवून दिला.

त्यांनी राष्ट्रीय स्तरावर विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या संगीत मैफिलींमध्ये भाग घेतला आणि गायक म्हणून सादरीकरण करताना त्यांनी श्रोत्यांना आपल्या गायन कौशल्याने मंत्रमुग्ध केले. नेपाळ येथील राजघराण्याने त्यांच्या प्रतिभेची आणि कौशल्याची दखल घेऊन त्यांनी आपल्या राजदरबारातील सन्माननीय गायक म्हणून त्यांची नियुक्ती केली होती.

त्यांनी आपल्या छत्रछायेखाली अनेक शिष्यांना शास्त्रीय संगीताची विद्या शिकवली, ज्यांनी कालांतराने भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात आपल्या उल्लेखनीय कार्यातून चिरस्थायी छाप पाडली. त्यांच्या प्रतिभावंत शिष्यांमध्ये त्यांचे पुत्र शिवरामबुवा वझे यांच्यासह बापूराव पेंढारकर, दीनानाथ मंगेशकर, केशवराव भोसले, गुरुराव देशपांडे आणि विनायक पटवर्धन यांचा प्रामुख्याने समावेश होता.

गायक, संगीतकार म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या रामकृष्णाबुवा वझे यांनी 'संगीत प्रकाश' नावाचे पुस्तक लिहिले, ज्यामुळे त्यांना प्रशंसा आणि सन्मान मिळाला. एचएमव्हीने रेकॉर्ड केलेल्या त्यांच्या गायनाने त्यांची ख्याती संपूर्ण भारतात पसरवली. देशाच्या विविध भागात संगीत क्षेत्रातली आपली अविस्मरणीय छाप पाडून, कालांतराने त्यांनी जेव्हा गोव्यात आगमन केले तेव्हा त्यांनी  फोंड्यातील नागेशी आणि डिचोली येथील लामगाव येथे १८ वर्षे गायनाचे प्रशिक्षण दिले. इथल्या तरुणाईत शास्त्रीय संगीत गायनाची अभिरुची निर्माण करण्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान बजावले होते. गोव्याहून नंतर ते पुण्यात स्थायिक होण्यासाठी गेले आणि तेथे त्यांनी काही काळ संगीत विद्यालयही सुरू केले. 

संगीताचे ज्ञान आणि कौशल्य आपल्या शिष्यांना देत असताना ५ मे १९४५ रोजी या थोर व्यक्तिमत्त्वाने अखेरचा श्वास घेतला.

भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानाव्यतिरिक्त, त्यांनी मराठी संगीत नाटकांचे संगीतकार म्हणून अविस्मरणीय छाप निर्माण केली. मराठी संगीत रंगभूमीला त्यांनी ज्या शास्त्रीय संगीताचा गाभा कायम ठेऊन, गोड आणि अविट चाली लावल्या. संगीतकार म्हणून त्यांनी आपल्या उत्तुंग प्रतिभेचे आणि कौशल्याचे रसिकांना दर्शन घडवले, त्यामुळे आजही त्यांच्या गाण्यांचे श्रवण ध्वनिमुद्रिकांद्वारे करण्याची जेव्हा रसिकांना संधी लाभते, तेव्हा त्यांना या शास्त्रीय संगीत सूर्याच्या कर्तृत्वाची प्रचिती येते.

दोडामार्ग तालुक्यातील सुंदर आणि हिरव्यागार वझरे गावात जन्मलेले, तेथील ग्रामदेवी सातेरी केळबाईचा आशीर्वाद लाभलेले आणि लहान वयात गावापासून शिक्षणासाठी दूर गेले असले, तरी गावकऱ्यांनी गायलेली भजने तसेच विविध पारंपरिक मांडावर होणाऱ्या लोकगीतांचे गायन, त्यांच्या स्मरणात कायमची छाप सोडून गेले. त्यामुळे त्यांच्या अंगभूत संगीत प्रतिभा आणि कौशल्यांना प्रोत्साहन मिळाले. भारतातील धार्मिक आणि आध्यात्मिक केंद्र समजल्या जाणाऱ्या वाराणसीमध्ये त्यांना स्वामी विवेकानंदांसोबत १५ दिवस राहण्याची संस्मरणीय संधी मिळाली. तेथील मुक्कामात त्यांना स्वामी विवेकानंदाचे आध्यात्मिक प्रवचन ऐकण्याची संधी प्राप्त झाली आणि त्या बदल्यात स्वामीजींनी या प्रतिभावंत गायकाची गाणी ऐकण्यात वेळ घालवला. स्वामीजींनी त्यांच्या गायन शैलीवर प्रसन्न होऊन,  त्यांना “यशस्वी भव” असा आशीर्वाद दिला. स्वामीजींनी दिलेला आशीर्वाद, त्यांच्या अंगी असणारी प्रतिभा आणि शास्त्रीय संगीत आणि गायनाचे अध्ययन करण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण आरंभलेले प्रयत्न, चिकाटी आणि साधना या पाठबळावर त्यांनी केवळ भारतातच नव्हे, तर भारताबाहेरही आपल्या गायकीने तसेच संगीतकार म्हणून केलेल्या यशस्वी प्रयोगामुळे त्यांना प्रसिद्धी लाभली. रामकृष्णबुवा वझे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गावात निर्माण झालेले स्मारक, या संगीत सूर्याच्या कर्तृत्वाची स्मृती कायम ठेवलेली आहे.

- राजेंद्र केरकर

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५