पोळे येथे कंटेनरला स्कूटरची धडक; नौदल कर्मचाऱ्याचा मृत्यू

२३ वर्षीय दीपक सिंग ठार : सहकारी गंभीर जखमी

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
3 hours ago
पोळे येथे कंटेनरला स्कूटरची धडक; नौदल कर्मचाऱ्याचा मृत्यू

पैंगीण : पोळे येथे सोमवारी रात्री स्कूटर आणि कंटेनर ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात नौदलातील २३ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. दीपक सिंग (रा. पंजाब) असे मृताचे नाव असून, तो कारवार येथील नौदल तळावरील आयएनएस विक्रमादित्य या युद्धनौकेवर कार्यरत होता. या अपघातात स्कूटरच्या मागे बसलेला त्याचा सहकारी महेश कुमार (२४, रा. राजस्थान) गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काणकोण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री पोळे येथे हा अपघात घडला. दीपक सिंग हा केए-२८-ईझेड-६७५५ क्रमांकाच्या एप्रिलिया स्कूटरवरून जात होता. यावेळी काणकोणहून कारवारच्या दिशेने जाणाऱ्या एमएच-४३-बीपी-१६९८ क्रमांकाच्या कंटेनर ट्रकला स्कूटरची मागून जोरदार धडक बसली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर दीपक सिंग याला काणकोण येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील कर्तव्यावरील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. महेश कुमार याला पुढील उपचारांसाठी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

मंगळवारी दीपक सिंग याच्या मृतदेहाची शवचिकित्सा करण्यात आली. त्यानंतर अंतिम संस्कारांसाठी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शवचिकित्सा अहवालानुसार, जोरदार आघातामुळे डोके, छाती आणि पोटाला झालेल्या गंभीर दुखापती मृत्यूचे कारण ठरल्या.

या प्रकरणी काणकोण पोलिसांनी मोटार वाहन अपघाताची नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक थेरॉन डीकॉस्टा यांच्या देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक अजित वेळीप पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा