वास्को अग्निकांडाचा बोध घेण्याचे खरे आव्हान

वास्तविक गतवर्षी उत्तर गोव्यात हडफडे येथे जे बर्च क्लबमध्ये अग्निकांड होऊन २५ हून अधिक लोकांचा बळी गेला होता त्यानंतर असे प्रकार होणार नाहीत याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायला हवे होते, पण वास्कोतील घटनेने आपण बर्च क्लबच्या घटनेतून कोणताच धडा घेतलेला नाही, हेच दाखवून दिले.

Story: विचारचक्र |
02nd November, 11:25 pm
वास्को अग्निकांडाचा बोध घेण्याचे खरे आव्हान

गेल्या आठवड्यात वास्कोत एकाच दिवशी तीन ठिकाणी आगी लागण्याचे प्रकार घडले. त्यातील संडे मार्केटमध्ये भडकलेली आग ही भयानक ठरली. केवळ वास्कोतच नव्हे, तर संपूर्ण गोव्यात अशा प्रकारे भडकलेल्या आणि त्यात कोट्यवधींची मालमत्ता, विशेषतः शेकडो दुकाने खाक होण्याची ती पहिलीच घटना असावी. त्या मार्केटमधील विविध मजल्यांवर व इमारतीच्या सर्वात वरच्या उघड्या गच्चीवर असलेली सगळी दुकाने त्या भीषण आगीत खाक झाली. नेमकी किती दुकाने होती, त्याचा निश्चित आकडा कोणाकडेच नाही. कारण गोव्यातील सगळ्याच मार्केटांमध्ये अधिकृत म्हणजे परवाने असलेल्या दुकानांच्या कितीतरी पट अधिक दुकाने विनापरवाना उभारलेली असतात. त्यात सर्व संबंधितांचा हात असतो, हे उघड आहे. आता संबंधित यंत्रणेने दुकानांच्या संख्येचा व नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू केलेले आहे व त्यासाठी कागदपत्रे सादर केली जात आहेत. त्यामुळे अधिकृत विक्रेते किती होते, ते स्पष्ट होणार आहे. मात्र, त्याचबरोबर जी दुकाने अधिकृत नव्हती, पण भस्मसात झाली, त्यांचे काय? तसेच केवळ भरपाईने भागणार नाही, तर त्यांच्या पुनर्वसनाचे काय? हा मुद्दाही उपस्थित होणार आहे. आता मुद्दा आग नेमकी का भडकली, हा आहे. हल्ली अशी एक मानसिकता तयार झाली आहे की कुठेही आग भडकली की शॉर्ट सर्किट असे कारण पुढे केले जाते. हे कारण पुढे केले की कोणीच अधिक खोलात जात नाही. पण शॉर्ट सर्किट म्हटले म्हणून भागत नाही, तर ते का होते याचे कारणही शोधून त्याची पुनरावृती होणार नाही याची दक्षता घेतली गेली पाहिजे. पण, ती घेतली जात नाही व त्यामुळे वरचेवर अशा आगी भडकताना दिसतात.

खरे तर गोव्यातील सगळ्याच शहरांतील व ग्रामीण भागांतील बाजारांची एकंदर अवस्था आगीस निमंत्रण देणारीच आहे. पण कोणीच त्याकडे गंभीरपणे पाहत नाही. उलट आगीच्या घटना घडल्या की प्रत्येक जण अग्निशामक दलावर ठपका ठेवून मोकळा होतो. वास्कोतील उदाहरण घेतले, तर त्याची प्रचिती येते. वीसेक बंब दाखल होऊन व त्यांनी अथक प्रयत्न करूनही तेथील संडे मार्केट महाभारतातील लक्षागृहाप्रमाणे जळून खाक का झाले? याचा गंभीरपणे विचार खरे तर संबंधित यंत्रणेबरोबरच तेथील दुकानदारांनीही करायला हवा. परवा सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन तेथील ‘दामबाबा’ला सांकडे घातले, हे खरेच. पण, त्याबरोबरच त्यांनी खरे म्हणजे एक शपथही तेथे घ्यायला हवी होती, ती म्हणजे आपण बेकायदेशीरपणे दुकाने उभारणार नाही व त्यासाठी लाकडी व प्लास्टिकच्या वस्तूंचा उपयोग करणार नाही. बहुतेक दुकाने कापरासारखी जळून गेली, कारण ती अशा आगीस मदत करणाऱ्या साहित्याचा उपयोग करून उभारली गेली होती. त्यामुळे अग्निशामक दलसुद्धा काहीच करू शकले नाही. केवळ वास्कोतील संडे मार्केटच कशाला गोव्यातील बहुतेक नगरपालिका क्षेत्रांतील मार्केटांची अशीच अवस्था आहे. पणजी, मडगाव, म्हापसा, फोंडा व अन्य भागांतही फेरफटका मारला, तर हेच चित्र आहे. पावसाळ्यात पावसापासून संरक्षण म्हणून केवळ दुकानांवरच नव्हे, तर उघड्यावर बसून विक्री करणारे विक्रेतेही अशाच प्रकारचे प्लास्टिकचे आच्छादन घालतात व नंतर पावसाळा संपून उन्हाळा सुरू झाला तरीही ती तशीच राहतात. वास्तविक पावसाळा संपताच ती हटविणे गरजेचे असते, पण विक्रेते ती तसदी घेत नाहीत आणि पालिका किंवा संबंधित यंत्रणाही त्याकडे लक्ष देत नाही. मात्र, अशी एखादी घटना घडली की मग सगळेच खडबडून जागे होतात व एकमेकांकडे अंगुलिनिर्देश करणे सुरू होते. पण तोपर्यंत प्रचंड विलंब झालेला असतो. वास्तविक गतवर्षी उत्तर गोव्यात हडफडे येथे जे बर्च क्लबमध्ये अग्निकांड होऊन २५ हून अधिक लोकांचा बळी गेला होता त्यानंतर असे प्रकार होणार नाहीत याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायला हवे होते, पण वास्कोतील घटनेने आपण बर्च क्लबच्या घटनेतून कोणताच धडा घेतलेला नाही, हेच दाखवून दिले.

कोणत्याही प्रकारची अशी घटना घडली की त्याबद्दल दुःख व्यक्त केले, नंतर नुकसान भरपाई दिली वा जाहीर केली, आपदग्रस्तांचे पुनर्वसन केले की भागले, अशी एक मानसिकता हल्लीच्या काळात रूढ होताना दिसते, पण अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी मात्र घेतली जात नाही, याचेच वैषम्य वाटते. परवाचेच उदाहरण या संदर्भात घेता येईल. वास्को अग्निकांडाचे निखारे विझण्यापूर्वीच १ नोव्हेंबरपासून पुनर्वसनाचे काम हाती घेतले जाईल, अशा घोषणा केल्या गेल्या, तर आणखी कोणी स्वखर्चाने मार्केट उभारून देण्याचे जाहीर केले. आपदग्रस्तांच्या  वेदनांवर फुंकर घालण्यासाठी या घोषणा ठीक आहेत, पण पुनर्वसन करताना किंवा नवीन मार्केट उभारताना घाई न करता आवश्यक ती खबरदारी  घेतली जाईल, पुन्हा अशा दुर्घटना होणार नाहीत  याची दक्षता घेतली जाईल, किंबहुना आगप्रतिबंधक यंत्रणेची तरतूद घेतली जाईल, अशी ग्वाही कोणीही दिली नाही. वास्तविक कोणावर ठपका ठेवण्याचा यामागे हेतू नाही, पण गोव्यातील केवळ नगरपालिका मार्केटांचीच केवळ नव्हे, तर अनेक बहुमजली व्यापारी संकुलांचीदेखील अशीच अवस्था आहे. बहुतेक ठिकाणी मंजूर संख्येच्या अधिक पट दुकाने चालतात, ती सुद्धा इतकी खेटून की लोकांना चालून जाण्यासही जागा नसते. अनेक ठिकाणी तर आपत्कालीन प्रसंगी धावून आलेल्या बंबाला सुद्धा जाता येत नाही. अनेक बहुमजली निवासी संकुलांमध्ये फक्त नावाला अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसवलेल्या आढळतात, पण त्यांची वार्षिक चाचणीदेखील होत नाही. याला केवळ संबंधित यंत्रणाच जबाबदार नाहीत, तर तेथील रहिवासी, त्यांचे राजकीय लागेबांधेही कारणीभूत असतात. या सर्वांची भांडाफोड होते ती एखादी दुर्घटना घडल्यावर, मग परस्परांवर अंगुलीनिर्देश होतात वा सरकारवर दोषारोप केले जातात, मग सगळे शांत होते, ते परत एखादी दुर्घटना घडेतोवर. प्रत्येक नगरपालिका मार्केटात व्यापारी संघटना असतात. त्या सतत आपल्या मागण्यांसाठी तत्पर असतात. त्यांनी या बाबी गंभीरपणे घेतल्या, तर निश्चितच अशा घटना टळतील व आपण वास्को घटनेतून बोध घेतला, असे म्हणता येईल.