प्रश्न : नमस्कार, सद्गुरू. इतक्या लोकांनी वेढलेले असूनही, आपल्याला अजूनही कोणाचे तरी असण्याची, कोणाकडून तरी स्वीकारले जाण्याची, कोणाकडून तरी प्रेम मिळण्याची भावना असते. या असंतोषाला आणि एकटेपणाला आपण कसे सामोरे जावे?
सद्गुरू : तुम्हाला हे ठरवले पाहिजे की, तुमच्या जीवनात स्वातंत्र्य किंवा बंधन यापैकी सर्वोच्च मूल्य कशाचे आहे. समस्या अशी आहे की, बहुतेक लोकांसाठी, जर ते स्वतंत्र असतील, तर त्यांना असे वाटते ते हरवले आहेत. उदाहरणार्थ, जर तुम्ही डोंगराच्या मोकळ्या जागेत आहात आणि तुमच्या आजूबाजूला कोणीही नाही, तर तुम्हाला मोकळेपणा वाटणार नाही – तुम्हाला वाटेल की तुम्ही हरवला आहात.
बहुतेक लोक स्वातंत्र्य हाताळू शकत नाहीत, कारण स्वातंत्र्य हाताळण्यासाठी, तुम्हाला एक विशिष्ट स्पष्टता आणि बळ हवे असते. लोक नेहमी स्वतःला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, पण ते सतत स्वातंत्र्याबद्दल बोलत राहतात. जर तुम्ही त्यांना खरोखर स्वातंत्र्य दिले, तर त्यांना प्रचंड त्रास होईल. हा एक उत्क्रांतीचा मुद्दा आहे, या अर्थाने की, मनुष्य सध्या पिंजऱ्यातल्या पक्ष्यासारखा आहे. जर तुम्ही एखाद्या पक्ष्याला बराच काळ पिंजऱ्यात ठेवले आणि मग एके दिवशी पिंजऱ्याचा दरवाजा काढून टाकला, तरीही पक्षी उडून जाणार नाही. आतून, तो बंड करेल की तो स्वतंत्र नाही, पण तो उडून जाणार नाही. मानवी स्थिती अगदी अशीच आहे.
चला आपण याकडे पाहू या की, तुम्हाला स्वतंत्र व्हायचे असेल, तर काय घडणे आवश्यक आहे. तुम्हाला हे समजून घेणे गरजेचे आहे की, सर्व मानवी अनुभवाला एक रासायनिक आधार आहे. तुम्ही ज्याला आनंद, दुःख, ताण, चिंता, वेदना आणि परमानंद म्हणता, ती वेगवेगळ्या प्रकारची रसायने आहेत. किमान परमानंद हे एक वेगळ्या प्रकारचे रसायन आहे हे तुम्हाला माहित आहे. तुमच्या जीवनाच्या अनुभवाला रासायनिक आधार आहे. दुसऱ्या शब्दांत, तुम्ही सध्या ज्याला स्व म्हणता ते एक रासायनिक सूप आहे. प्रश्न असा आहे की, तुम्ही एक उत्तम सूप आहात की वाईट?
आता, जर तुमच्याकडे आनंदाचे रसायन असेल, तर कोणी जवळपास असो किंवा नसो, ते अप्रतिम आहे, कारण यापुढे तुमच्या जीवनाचा अनुभव तुमच्याकडे काय आहे आणि काय नाही यावरून ठरवला जात नाही. एकदा का तुमची जगण्याची पद्धत बाहेरच्या कोणत्याही गोष्टीने ठरवली गेली नाही, तर एकटेपणा नावाची अशी कोणतीच गोष्ट नसते.
महत्त्वाची गोष्ट ही आहे की, तुम्ही स्वतःच्या आतमध्ये कसे आहात. जर तुम्ही इथे अशा प्रकारे आहात की, तुम्ही केवळ तुमच्या गरजांच्या अधीन आहात, तर तुम्ही एक अतिशय संकुचित जीवन जगाल. पण जर तुम्ही कोणत्याही गरजेशिवाय इथे बसू शकलात आणि जे आवश्यक आहे ते करू शकलात, तर तुम्ही एक भव्य जीवन जगाल. माझी अशी इच्छा आणि आशीर्वाद आहे की, तुमच्यापैकी प्रत्येकाचे जीवन विलक्षण असले पाहिजे. हे स्वतःसाठी घडवून आणा.
जीवनाचा शोध घ्या
शोध घेणे म्हणजे काय? शोध घेणे म्हणजे जिथे तुम्ही कधीच गेला नाहीत अशा क्षेत्रांमध्ये प्रवेश करणे. शोध ही एक कल्पना नाही. जर तुम्ही घरी बसून आफ्रिका खंडाचा शोध घेत आहात, तर त्याला कल्पना म्हणतात. जर तुम्ही आफ्रिका खंडात जाऊन त्या खंडातून चालत फिरलात, त्याला शोध म्हणतात. यात खूप मोठा फरक आहे.
जर जीवन इतके लहान आहे की, त्याचा सारांश तुम्ही अगदी थोडक्यात करू शकत असाल आणि एखाद्या अर्थहीन स्थितीतून जात आहात जिचा सारांश तुम्ही दहा मिनिटांत करू शकत असाल, तर इतकी वर्षे इथे जगणे अगदीच व्यर्थ आहे. तुम्ही जीवनाचा केवळ शोध आणि शोध घेत राहू शकता. तुम्ही कधीही त्याचा सारांश करू शकत नाही. जर तुम्ही त्याचा सारांश केलात, तर त्याचा अर्थ तुम्ही संपूर्ण मुद्दा समजू शकला नाहीत. विचारसरणी नव्हे तर शोध आवश्यक आहे. विचारसरणी म्हणजे तुम्ही जीवनाचा सारांश केला आहे. आपण जीवनाचा सारांश करू नये.
जीवनात सुरक्षिततेचा शोध घेणे हा शोध घेण्यातला सर्वात मोठा अडथळा आहे. प्रवाही आणि गतिमान असण्याऐवजी, तुमच्याकडे जे काही थोडेफार आहे ते, तुम्हाला घट्ट आणि ठोस करायचे असते. जेव्हा जीवन साचून राहते, तेव्हा ते भयानक बनते. मग तुमच्यासोबत असे घडेल की : तुम्ही कधीही मनापासून मोठमोठ्याने रडणार नाही किंवा पूर्णपणे हसणार देखील नाही. तुमचे अश्रू सांडणार नाहीत किंवा तुमचे हास्य देखील खुलणार नाही. तुम्ही एका अधांतरी अवस्थेत जाल. जर तुम्ही जीवन पूर्णत्वाने जगलात, तर ते उत्तम आहे. तुम्ही जगलात आणि नंतर मरून पडलात, तर ते ठीक आहे. पण अधांतरी अवस्थेत, तुम्ही जिवंत देखील नसता आणि मृत देखील नसता; जेव्हा तुमचे मरण येते, तेव्हा तुम्हाला जाणवते की तुम्ही न जगताच मरत आहात. ही एक शोकांतिका आहे. तुम्ही पहाल, जगातील ९०% पेक्षा जास्त लोक अशाच प्रकारे मरतात.
जर तुम्ही मरणाऱ्या लोकांकडे पाहिले, ते ७० किंवा ८० वर्षे जगलेले असतात, आणि जेव्हा मृत्यूचा क्षण येतो, अंतिम क्षण, तुम्ही पहाल की त्यांचे चेहरे गांगरलेले आहेत. ते गांगरलेले आहेत, कारण ते न जगताच मरत आहेत. जीवनाचा एक कणभर देखील माहित न होता ते जात आहेत. जर तुम्ही उल्हासात आणि आनंदाने मरत असाल तर ते विलक्षण आहे किंवा तुम्ही जर किमान शांतपणे मरत असाल तर ते ठीक आहे. पण जर तुम्ही गांगरून मरत असाल, तर याचा अर्थ तुम्ही न जगताच मरत आहात. ही सर्वात भयानक गोष्ट आहे. कोणीही गांगरून मरावे अशी माझी इच्छा नाही.



