फुटबॉल क्षेत्राच्या प्रगतीचे आव्हान

गोव्यात फुटबॉलसाठी चांगल्या पायाभूत सुविधा उभारण्यापासून गोव्यातील फुटबॉलपटूंना भारतीय फुटबॉल क्षेत्रात अग्रस्थान मिळेल, यासाठी त्यांना प्रशिक्षित करण्यापर्यंत अनेक आव्हाने नव्या समितीसमोर आहेत. ते काम पुढे नेण्यासह गोव्यातील फुटबॉल क्षेत्राचा नावलौकिक वाढवण्याचे आव्हान वालंका आलेमाव आणि त्यांची नवी कार्यकारिणी स्वीकारेल, अशी अपेक्षा आहे.

Story: संपादकीय |
28th October, 11:22 pm
फुटबॉल क्षेत्राच्या प्रगतीचे आव्हान

आलेमाव घराण्याचा लौकिक हा राजकारणासोबतच फुटबॉलच्या क्षेत्रातही आहे. बऱ्याच वर्षांपासून हे कुटुंब फुटबॉल खेळाकडे प्रामाणिक राहिले आणि वाईट स्थितीतही त्यांनी आपला संघ टिकवून ठेवला. आता तर त्याच कुटुंबातील वालंका आलेमाव यांची गोवा फुटबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. गोव्याच्या फुटबॉल संघटनेची पहिली महिला अध्यक्ष म्हणूनही त्यांचे नाव आता कायमचे राहणार आहे. मात्र, ही संघटना चालवणे हेही आव्हान वालंका यांच्यासमोर असणार आहे. कारण मावळते अध्यक्ष कायतानो फर्नांडिस यांनी पदरमोड करून संघटना चालवली आणि संघटनेचे कार्यही रुळावर आणले. आता पुन्हा तिथे बजबजपुरी होणार नाही, याची काळजी वालंका आलेमाव घेणार का? असा प्रश्न आहे. कारण कायतानो फर्नांडिस यांच्यापूर्वीच्या कार्यकारिणींकडून संघटनेकडे प्रचंड दुर्लक्ष झाले होते, त्यामुळेच संघटनेची आर्थिक स्थितीही वाईट होती. फुटबॉल सामने वेळेवर होणे तर दूरच, उलट काही सामने झालेच नव्हते. कायतानो फर्नांडिस यांनी गोवा फुटबॉल संघटनेचा कायापालट केला, हे विसरता येणार नाही. भलेही या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, मात्र त्यांनी दिलेले योगदान फार महत्त्वाचे आहे. ही निवडणूक जरी कायतानो हरले असले, तरी त्यांनी गोव्यातील फुटबॉलसाठी आपल्या कार्यकाळात जे काम केले, ते काम सुरू ठेवणे हे नव्या समितीवर बंधनकारक असेल.

१९५९ साली स्थापन झालेली गोवा फुटबॉल संघटना आता ७० वर्षांचा टप्पा गाठत आहे. या काळात गोव्यात फुटबॉलची क्रेझ निर्माण करण्यापासून मोठ्या लीग आयोजित करण्यापर्यंत अनेक टप्पे गोव्याने पाहिले. गोव्यात क्रिकेटचे वारे जास्त आहे, पण तितकेच फुटबॉलचेही आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सरकारनेही या कामात पुढाकार घेत गोवा फुटबॉल विकास महामंडळाची स्थापना करून गोव्यात फुटबॉलसाठी आणखी पोषक वातावरण तयार करण्यासाठी पुढाकार घेतला. गोवा फुटबॉल संघटनेने बांदोडकर चषक, गोवा पोलीस चषक, वेगवेगळ्या वयोगटातील मुला-मुलींसाठी वेगवेगळ्या लीगचे आयोजन सुरूच ठेवले आहे. मधल्या काही काळात संघटनेची स्थिती अत्यंत बिकट झाली. एका अहवालानुसार २०१८ ते २०२२ या काळात तर संघटना डबघाईला आली होती. कार्यक्रम, लीग, सामने साऱ्याच गोष्टी बंद पडत आल्या होत्या. संघटनेची आर्थिक स्थितीही अत्यंत बिकट होती. मात्र, २०२२ ते २०२६ या काळात संघटनेकडे भक्कम आर्थिक तरतूदही आली आणि सामने, लीग साऱ्याच गोष्टी पुन्हा सुरू झाल्या. संघटनेने पहिली लीग १९५९ साली सुरू केली होती. पुढे ऐंशीच्या दशकात लीगचा विस्तार करून उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा अशा लीग सुरू झाल्या. साळगावकर, चर्चिल ब्रदर्स, धेंपो स्पोर्ट्स क्लब, स्पोर्टिंग क्लब दी गोवा, वास्को स्पोर्ट्स क्लब, शापोरा युवक संघ, जीनो, गार्डियन एंजेल अशा क्लबपासून ते आताच्या एफसी गोवापर्यंत अनेक संघ गोव्यात नावारुपास आले, ज्यांनी फुटबॉलच्या विकासात आणि त्याच्या लोकप्रियतेत मोठा वाटा उचलला. गोवा फुटबॉल संघटनेने केलेले कार्य हे गोव्यातील फुटबॉल क्षेत्राच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे ही संघटना मोठी व्हावी, गोव्यात चांगले खेळाडू संघटनेने तयार करावेत अशीच अपेक्षा आहे. राजकारणापासून संघटना दूर ठेवता येत नाही, हे या संघटनेच्या निवडणुकांदरम्यान वारंवार दिसून आलेले आहे. मात्र, शेवटी गोव्यातील फुटबॉल खेळाला प्राधान्य देऊन देशात गोव्याचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. कायतानो यांच्या काळात गोव्यातील फुटबॉमध्ये झालेले ‘मॅच फिक्सिंग’चे प्रकरण समोर येऊन फुटबॉल खेळाडूंवर कारवाई झाली. कदाचित त्यामुळेच किंवा राजकीय कारणांमुळे कायतानो यांना पराभव पत्करावा लागला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघटना पुढे नेण्याचे आणि गोव्यातील फुटबॉल खेळाडूंना प्राधान्य देऊन नवे खेळाडू तयार करण्यापासून ते गोव्यातील सध्याच्या खेळाडूंना चांगली संधी मिळेल यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान नव्या समितीसमोर असेल. गोव्यात फुटबॉलसाठी चांगल्या पायाभूत सुविधा उभारण्यापासून गोव्यातील फुटबॉलपटूंना भारतीय फुटबॉल क्षेत्रात अग्रस्थान मिळेल, यासाठी त्यांना प्रशिक्षित करण्यापर्यंत अनेक आव्हाने नव्या समितीसमोर आहेत. ते काम पुढे नेण्यासह गोव्यातील फुटबॉल क्षेत्राचा नावलौकिक वाढवण्याचे आव्हान वालंका आलेमाव आणि त्यांची नवी कार्यकारिणी स्वीकारेल, अशी अपेक्षा आहे.